महाराष्ट्रमुंबई

औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक तो पुसला पाहिजे ही जनभावना- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर स़डकून टीका

मुंबई : क्रूरकर्म्या औंरगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अमानूष छळ केला. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरु असलेली आंदोलने ही जनभावना आहे. औरंग्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. देशातील सच्चा मुसलमान देखील औरंग्याचे उदात्तीकरण करणार नाही. मात्र विरोधकांचा औरंग्या नातेवाईक लागतोय का? औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायलवा हवी, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी ४० दिवस औरंग्याने अगणित अत्याचार केले. मात्र तरिही त्याच्यापुढे संभाजी महाराज झुकले नाहीत. देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केले. त्यामुळे औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा, अशी लोकांची भावना आहे, असे शिंदे म्हणाले. या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केले आणि राज्य केले. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीश सत्तेचा कलंक पुसण्यात आला. तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंग्याचा कंलक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यंना महाराष्ट्र माफ करणार नाही. अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले, असे ते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जे जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. औरंग्याच्या क्रूर शासनाची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने सपकाळ यांच्यावर अत्याचार केलेत का अमानूष छळ केला का? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिला.

नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!