नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल; “जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार”

मुंबई प्रतिनिधी : नागपूर दंगल प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आज सभागृहात आणि बाहेर जोरदार टीका करत विरोधकांवर हल्लाबोल केला. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर प्रकरणावर सभागृहात सविस्तर निवेदन दिलं, दुपारीच हा विषय संपला होता. पण संध्याकाळी काहीजण आंदोलनासाठी पायऱ्यांवर आले. हे सगळं पूर्वनियोजित असल्याचा वास येतोय,” असा आरोप त्यांनी केला.
“पोलिस कायदा-सुव्यवस्था राखत होते, मग त्यांच्यावर हल्ला का झाला? एका पोलिस अधिकाऱ्यावर थेट कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. आंदोलन सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे, पण हा कोणता प्रकार? ट्रक भरून दगड कुठून आले याची चौकशी होणार आहे,” असे राणे म्हणाले.
“पाकिस्तानमधील अब्बा आठवेल अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. हे सगळं सुरू केलं सुरुवात अबू आझमीने. काँग्रेसने शालेय पुस्तकांमध्ये चुकीची माहिती भरली, त्यामुळे समाजात फूट पडते आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“सभागृहात कोणी माझं नाव घेत नाही, पण बाहेर पायऱ्यांवर सात-आठ टकली माझा फोटो लावून आंदोलन करत होती. अशी काही मागणी करू नका, नाहीतर सरकार पडेल,” असा इशाराही राणे यांनी दिला.
“मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या यादीत आहे. आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणतो, आधी कंठ फुटू द्या मग पेटवण्याची भाषा करा. जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार,” असा इशारा देत राणेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.