भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीत मोठा गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून, याप्रकरणी रॅकेट चालवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हे प्रकरण उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, भुसावळ औष्णिक केंद्रातील राखेची बाजारभावाने किंमत ६०० ते ६६० रुपये प्रतिटन असताना ती केवळ ३५३ रुपये दराने विकण्यात आली. यामध्ये स्पष्टपणे आर्थिक गैरव्यवहार झाला असून, यासाठी निविदा प्रक्रिया वापरून अर्धी राख मोजणी न करताच विकली गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, “ही प्रक्रिया ठरवून राबवण्यात आली असून, यामागे मोठा भ्रष्टाचार आहे. यामुळेच वाल्मीक कराड सारखे लोक निर्माण होतात आणि राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई केली पाहिजे.”
या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राखेच्या विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. “भुसावळ औष्णिक केंद्रातील राख विक्रीच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात केली.
या प्रकरणामुळे ऊर्जा विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.