काँग्रेस जातीपातीचा खेळात व्यस्त, जातीचा खेळ खेळणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा – पंतप्रधान

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात सर्वप्रथम नाशिक मधील तपोवन या पंचवटीतील रामाने वनवास भोगलेल्या भूमीपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशाल जनसभेला संबोधित केले त्यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की काँग्रेस जातीपातीचा खेळ करत आहे त्यामुळे त्यांना ओबीसीच्या विविध घटकांमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजून घेण्याची आवश्यकता वाटत आहे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि मित्र पक्ष हे प्रयत्न करत आहेत पण यातून देश आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे पण त्याच्याशी काँग्रेस आणि मित्र पक्षांना काहीही घेणे देणे नाही तर त्यांना फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता हवी आहे अशांना जनता सत्ता देईल का असा प्रश्न उपस्थित करून मोदी म्हणाले की अशा संधी साधू लोकांना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवून जे विकास करू शकतील अशा भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजय करावे असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस जातीपातीचा खेळ करून आपली पोळी भाजून घेण्याच्या तयारीत आहे आणि त्यांना आपली सत्ता स्थापन करावयाची आहे पण जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल देशाला सक्षम बनवायचा असेल तर अशा शक्तींपासून दूर राहिला पाहिजे आणि जे देशाचा आणि राज्याच्या विकास करू शकतील अशा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महायुती सरकारने विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला मोठे महत्त्व मिळाले आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. २०२६ च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठे केंद्र देखील बनतोय. नाशकात सुरक्षेची उपकरणे बनवली जात आहेत. नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
काँग्रेस आणि आघाडीवाले लोक आहेत, ते देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी एचएएलसंदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले. मात्र एचएएल रेकॉर्ड ब्रेक कामे करत आहे. नाशिक त्याचे परिणाम बघत आहे. डबल इंजिन सरकारमध्ये विकासाची गती डबल होते. योजनांचा लाभ पण डबल होता. येथे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान, नमो शेतकरी सन्मान निधी मिळत आहे. वर्षाला बारा हजारांची मिळणारी मदत वाढवून पंधरा हजार करण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच मी कांदा उत्पादकांची भावना समजतो. त्यासाठी कांदा निर्यातीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
येथे सोयाबीन, कापूस, धान आणि दुधाचे उत्पादन घेतले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्रँडिंग वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. इथेनॉल खरेदीसाठी शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांत सुमारे ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. देशाचा पैसा पेट्रोल घेण्यासाठी विदेशात जायचा. आता ते पैसे माझ्या देशातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. ते म्हणाले की, येथील कांदा शेतकऱ्यांच्या भावना मला समजतात. त्यामुळे कांद्याची निर्यात सुलभ करण्यासाठी धोरणे बदलण्यात आली आहेत.
पंतप्रधान मोदी महाविकास आघाडीवर टीका करत म्हणाले, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.