एअर इंडिया एक्स्प्रेसकडून प्रवाशांना भेट! 15 एप्रिलपासून मोपावरून 5 शहरांसाठी थेट विमानसेवा

गोवा : गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. १५ एप्रिल २०२५ पासून, मोपा विमानतळावरून देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा दिली जाणार आहे.देशांतर्गत लोकांचा विमानप्रवास सुलभ व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
एअर इंडिया एक्सप्रेसकडून यापूर्वी इंदूरच्या विमान सेवेची घोषणा करण्यात आली होती मात्र आता यात आणखीन चार शहरांचा समावेश करण्यात आलाय. एअर इंडिया एक्सप्रेसने मोपा विमानतळावरून थेट विमानसेवा सुरू केल्याने, प्रवाशांना देशातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून गोव्यातील मोपा विमानतळावरून बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदूर, पाटणा या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या घोषणेमुळे गोव्यातील विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पूर्वी या भागातील प्रवाशांना दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बराच वेळ लागत होता, मात्र आता मोपा विमानतळामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांना आता या विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकिटांची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.