कबुतर बाजी…

महेश पावसकर
पूर्वीच्या काळी जेव्हा संदेशवहनासाठी आजच्यासारखी मोबाईल वरून क्षणार्धात संपर्क साधू शकणारी व्हॉट्सॲप/ इमेल व्यवस्था नव्हती, तेव्हा कबूतर हा पक्षी अनेकांच्या विशेषतः राज घराण्यातील प्रेमी युगुलांच्या संदेश वाहनाचा प्रमूख मार्ग होता… कबुतरांच्या पायाला चिठ्ठी बांधून त्याला गच्चीच्या सौंध्यातून उडवले की तो त्याच्या इनबिल्ट गुगल मॅप्स वरून मार्गक्रमण करत इप्सित प्रेमी किंवा प्रेमिकेच्या स्थानी पोहोचवत असे.. अर्थात त्या साठी प्रशिक्षित कबुतरांचा वापर केला जात असावा..
कबुतरांचा संबंध प्रेमी युगुलांच्या चिठ्ठ्या चपाट्या पाठवण्यासाठी केला जात असे हा संशोधनाचा विषय आपल्याला हिंदी चित्रपट निर्मात्यांनी उपलब्ध करून दिला आहे. परंतु त्यावर अजून तरी कुणी पीएचडी केल्याचे ऐकिवात नाही. तसा कबूतर हा पक्षी सर्वत्र आढळतो विशेषतः उंच आणि पडक्या वास्तूंमध्ये, इमारतींच्या खिडक्यांवर आणि गवाक्ष यावर त्यांचे खुले आम प्रणयाराधन सुरू असते आणि म्हणूनच कदाचित गुटूर गु हा शब्द देखील प्रेमी युगुलांबाबत वापरला जातो. असा हा वरवर निरुपद्रवी वाटणारा पक्षी अखिल मानव जातीला मृत्यु कडे लोटणारा असाध्य असा रोग निर्माण करू पहात आहे असे काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते तर कदाचित खरे वाटले नसते..पण अलीकडेच कबुतरांच्या वाढलेल्या अनिर्बंध संख्ये मुळे आणि त्यांच्या विष्ठा आणि पिसे यातून पसरणाऱ्या अत्यंत जीवघेण्या अश्या ‘हायपर सेन्सेविटी न्यूमोनिटिस’ या रोगाचा फैलाव आणि त्यापासून झालेल्या मृत्यूंच्या कहाण्या पाहून, वाचून आणि ऐकून सुन्न व्हायला होते. अनेक नामवंत डॉक्टरांनी या भयंकर आजाराविषयी प्रसार माध्यमातून सचेत केले आहे.
आपल्या श्वासातून किंवा बोलण्यातून कुणा मुक्या जीवांची हत्या होऊ नये या साठी तोंडावर मास्क लावणाऱ्या, अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन मुनींच्या सेवेत समर्पित आणि ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणजेच आपल्या बोलण्या वागण्यातून दुखावलेल्या समस्त लोकांची क्षमा याचना करणाऱ्या जैन धर्मियांनी या कबुतरांना पोसायचा घेतलेला हट्ट आज समस्त मुंबईकर आणि देशभरातील अनेक जणांच्या जीवावर बेतणारा आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या च्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ आणि मनिषा कायंदे यांनी कबुतरखान्यामुळे प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या कबुतरांच्या संख्ये मुळे आणि त्यांच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या जीवघेण्या आजारांची आणि मृत्यूंची माहिती विधानमंडळ अधिवेशनात मांडली, त्यानंतर महापालिका आणि राज्य सरकार तर्फे कबूतर कबुतरखान्या वर घातलेल्या बंदी वर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. असे असताना दादर कबुतरखाना परिसरातील जैन धर्मियांनी सरकारात असलेले मंत्री आणि इतर राजकीय दबाव वापरुन बंदी उठवण्याची मागणी केली आणि त्याला धार्मिक परंपरा असल्याचे कारण पुढे केले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कबूतर खाना बंदीला “अचानक” म्हटले आणि नियंत्रित आहार घालण्याची व्यवस्था करण्याचे विधान केल्यानंतर दादर येथील अहिंसावादी जैन धर्मीय आक्रमक झाले आणि महापालिका आणि उच्च न्यायालयाने बंदी घातली असून देखील जी काही दांडगाई घालून कबुतरखाना खुला केला ते निषेधार्थ तर आहेच पण पोलिसांनी अशा वेळी बघ्याची भूमिका घेणे देखील मुंबई पोलिसांच्या उज्वल कारकिर्दीला निश्चितच भूषणावह नाही. आपल्या दांडगाईला आणि अनधिकृत कृत्याला पोलिस देखील वचकून राहिले हे बघताच त्यांची दादागिरी इतकी वाढली की एरव्ही शांततेचा संदेश देणारे एक मुनी आम्ही आमच्या धार्मिक परंपरे ला कुणी आडकाठी केली तर प्रसंगी शस्त्र उचलावे लागेल अशी चक्क धमकी देऊन मोकळे झाले.
मुंबई सारख्या दाटीवाटी असणाऱ्या शहरात कबुतरांमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असेल तर त्यावरची बंदी ही नक्कीच समर्थनीय आहे. मात्र या बंदीच्या समर्थनात आपली राजकीय दाणा पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करणे हे देखील खचितच योग्य नाही. अशामुळे मराठी आणि अमराठी वादाला फोडणी मिळत असेल तर त्याचा राजकीय लाभ उठवून महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसाला धोका होऊ शकतो आणि मुजोर आणि मराठी लोकांवर राग असणाऱ्या अमराठी लोकांची ताकद वाढू शकते आणि पर्यायाने मुंबईत पदोपदी मराठी माणसाला अपमानाला आणि अन्यायाला सामोरे जावे लागू शकेल काय? याचा विचार करण्याची आज खरोखरच गरज आहे.
मराठी लोक हे नेहमीच मुंबईत सर्व धर्मीय लोकांशी चांगले वागत असतात… मग ते सर्वसामान्य असोत,नोकरदार व्यावसायिक किंवा व्यापारी (भले संख्येने कमी असले तरी) असोत. मराठी व्यक्ती ही नेहमीच हिंदी लोकांशी संवाद साधताना हास्य जत्रेमधल्या समीर चौगुले सारखे मोडके तोडके का असेना हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करते आणि स्वतः ची हास्यजत्रा करून घेते..ते बदलून आता मराठीतच संवाद साधला पाहिजे.. कारण बऱ्याचदा दोन्ही व्यक्ती मराठी असून ही अनोळखी असल्याने हिंदी किंवा इंग्रजी मध्ये बोलले जाते..जी मुंबईची संस्कृती होता उपयोगी नाही. मुंबईत आवाज मराठी चाच घुमला पाहिजे यात शंका नाही पण त्या साठी आधी मुंबई मध्ये मराठी माणसांनी रिक्षा चालक, फळ आणि इतर वस्तू विक्रेते, दुकानदार, मोबाईल वरून आलेल्या फोन वर बोलणाऱ्या व्यक्ती या सर्वाशीच आधी मराठीत बोलले पाहिजे, मात्र समोरच्या व्यक्तीला मराठी समजत नसेल तर त्याला समजणाऱ्या हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलायला हरकत नाही. मात्र आपणच आपल्या मातृभाषेत बोलायला लाजत असू तर येणारा काळ कठीण आहे.
कबुतरखाना बंदी प्रकरणी मुंबईत 51 ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कबुतरां चे स्थलांतर कुठे आणि कसे करावे? याचा उपाय कुणीच सुचवताना दिसत नाही… बरे कबुतरांना भटक्या कुत्र्यां प्रमाणे एखाद्या गाडीत पकडून बंद करून जंगलात तर सोडता येणार नाही.. मग यावर उपाय काय? एवढे दिवस फुकट दाण्या पाण्याची सोय करून आयतोबा बनलेल्या कबुतरांची ची सोय करण्याची जबाबदारी या पक्ष्या बाबत भूतदया दाखवणारे घेणार काय? की आम्हाला दान धर्म करायचा आणि पुण्य पण कमवायचे पण ते आमच्या दारात आणि जवळपासच मग त्या कृत्यामुळे इतर माणसांचा प्राण जाईना का? हा विचार योग्य नाही.. बरे तुम्हाला माणसांपेक्षा आपला धर्म आणि कबूतर जास्त महत्त्वाचे वाटतात मग त्या कबुतरांमुळे चिमण्या, बुलबुल आणि इतर छोटे पक्षी नामशेष होऊन निसर्ग साखळी तील अनेक छोटे जीव नष्ट होतात तेव्हा त्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी आपण काहीच कसे बोलत नाही किंवा कृती करत नाही?
धर्माची गोळी ही अफू पेक्षा जास्त अमली आणि धोकादायक असल्याचे कार्ल मार्क्स चे वाक्य प्रसिद्ध आहे.. पण धर्माची नशा चढवून लोकांना आपापसात लढवायला लावून आपल्या राजकारणाचे दाणे टिपून माजायचे, सगळीकडे आपलीच अनिर्बंध सत्ता निर्माण करायची आणि आपली सात काय सातशे पिढ्यांची कमाई करायची हेच जर सत्ताधीशांचे उद्दिष्ट असेल तर
प्रत्येकाने आपल्या किमान दाण्यापाण्याची सोय करून ठेवावी, कारण येणारा काळ कठीण आहे… तूर्तास इतकेच!