महाराष्ट्रमुंबई

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद; सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म

विधानपरिषदेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर

मुंबई : ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत अभिनंदन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहि‍णींचा, लाडक्या भावांचा आहे, असे मी मानतो.  बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला कॉमन मॅनला सुपरमॅन करण्यासाठी आणखी बळ मिळो अशी प्रार्थना मी करतो, असे सांगू नको उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘भले दरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या तुकाराम महाराजांच्या ओळी मला खूप प्रिय आहेत. एखाद्याने जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून द्यायची, आणि एखाद्याने दगाफटका केला तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच तुकाराम महाराजांची शिकवण मी आयुष्यभर जपली.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी वारकरी संप्रदायासाठी काही भरीव गोष्टी करु शकलो असं सांगून, उपमुख्यमंत्री म्हणाले की, वारकरी बंधूंचा विचार करुन इतिहासात प्रथमच आमच्या काळात वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिलं गेलं, वारकरी विमाछत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला, वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचे कामही मार्गी लागले. विठूरायाच्या दर्शन रांगांसाठी आपण तात्काळ निधी दिला, मंदिर हेच संस्काराचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळेच ‘ब’ श्रेणीतील तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपण दोन कोटीवरून थेट पाच कोटी केला. पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही मदत म्हणजे काही उपकार नव्हेत, कारण वारकरी संप्रदायाचे या समाजावरील उपकार कोणी सात जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही.

संत तुकाराम महाराज यांच्या,‘शुद्धबीजा पोटीं, फळें रसाळ गोमटीं… या वाक्याचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीच्या सरकारच्या विचारांचे बीज शुद्ध आहे आणि त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताची विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत. हा पुरस्कार मला कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटीबद्ध होतो, आहे आणि सदैव राहीन अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!