दिंडोशी गोरेगाव मधील बेस्ट प्रवाशांना दिलासा – मिडीऐवजी मोठ्या बसगाड्या नागरी निवारा व मंत्री पार्क मार्गावर धावणार
आमदार सुनिल प्रभु यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबईतील बेस्ट सेवेअंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथील चार मिडी गाड्या केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅप धोरणानुसार स्क्रॅपमध्ये जाणार असल्याने प्रवाशांना होणारा गैरसोयीचा विचार करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत इतर डेपोमधून एकूण तेरा अतिरिक्त कन्वेन्शनल (मोठ्या आकाराच्या) बसगाड्या गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्या मोठ्या असल्याने एकाच गाडीत दोन मिडी गाड्यांच्या प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रतीक्षेत होणारा त्रास कमी होणार आहे.
सध्या गोरेगाव स्थानक ते नागरी निवारा १ व २ या ६४६ बस मार्गावर पाच गाड्या तसेच ३२७ क्रमांकाची गाडी (गोरेगाव स्थानक ते शिवशाही प्रकल्प, मंत्री पार्क) या मार्गावर चार गाड्या आणि ३४६ या मार्गावर चार गाड्या आरक्षित करण्यात आलेल्या असून या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, मिडी गाड्या लहान असल्यामुळे अनेक प्रवाशांना दुसऱ्या गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे यास्तव आमदार सुनिल प्रभु यांनी तत्कालीन बेस्ट महाव्यवस्थापक अनिल दिगीकर तसेच श्रीनिवासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. यामुळे नागरी निवारा व मंत्री पार्क मार्गावर मोठ्या गाड्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजच आलेल्या तेरा नवीन गाड्यांची पाहणी शिवसेना नेते व आमदार मा. सुनिल प्रभु यांनी केली. या प्रसंगी माजी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, माजी स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे तसेच बेस्ट प्रशासनाचे अधिकारी निनाद शिरोडकर, कनिष्ठ अभियंता अनिल यमगार आणि प्रवासी उपस्थित होते. येथिल प्रवाशांनी देखील आमदार सुनिल प्रभु यांच्या सोबत संवाद साधला.
यावेळी आमदार सुनिल प्रभु म्हणाले :
“गोरेगाव विभागातील प्रवासी नेहमीच गर्दीमुळे त्रस्त होत होते. विशेषतः नागरी निवारा आणि मंत्री पार्क या मार्गांवर मिडी गाड्यांची क्षमता कमी असल्याने प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांची वाट पाहावी लागत होती. मात्र आता मोठ्या गाड्या उपलब्ध झाल्याने एकावेळी जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, वाहतूक अधिक कार्यक्षम होईल आणि गर्दीवरही नियंत्रण मिळेल.” तसेच गोरेगाव स्थानक डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे बुजवून तत्काळ समतल करावा अशा सूचना देखील आमदार सुनिल प्रभु यांनी कार्यकारी अभियंता (इमारत विभाग) कदम यांना दिल्या. आणि काम तत्काळ न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. तसेच डेपो परिसरातील पुरेसा प्रकाश नसल्याने विजेचे बंद दिवे तत्काळ सुरू करणे व प्रवासी थांबे दुरुस्त करण्याच्या सूचना देखील आमदार प्रभू यांनी दिल्या. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरत असून, बेस्ट प्रशासनानेही पुढील काळात प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.