खासदार रविंद्र वायकर यांचे प्रयत्न व पाठपुरावा ; जोगेश्वरीतील नवलकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी रेल्वेकडून हिरवा कंदील

मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे मार्केट मिळावे यासाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या नवलकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी २००९ पासून प्रयत्न व पाठपुरावा करणाऱ्या २७ मुंबई उत्त्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांना यश प्राप्त झाले असून नवलकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्केटच्या पुनर्विकासासाठी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनजवळ मुंबई महानगर पालिकेचे नवलकर मार्केट आहे. हे मार्केट १९६५ साली बांधण्यात आले आहे. ह्या मार्केटमध्ये २३१ गाळे असून जीर्ण झाल्याने २०१५ साली ते धोकादायक घोषित करण्यात आले. या मार्केटचा पुनर्विकास व्हावा यासाठी रविंद्र वायकर २००९ पासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. सर्व सुविधांनी युक्त असे हॉंगकॉंगच्या धर्तीवर या मार्केटचा पुनर्विकास करण्यात यावा अशी सूचना खासदार वायकर यांनी मुंबई महानगर पालिकेकडे केली होती. यासाठी त्यांनी विधानसभेत लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा आदी लोकशाही आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी महिन्याभरात पुनर्विकासाच्या नकाश्याला मंजुरी देण्यात येईल त्याच बरोबर नकाशे मंजूर झाल्यानंतर याचे टेंडर काढण्यात येईल, असे आश्वासन मार्च २०२२ मध्ये विधानसभेत तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी दिले होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त (बाजार), यांच्यासमवेत बैठक घेतल्या तसेच निवेदनही दिले. मात्र रेल्वे प्रशासनाची मंजुरी न मिळाल्याने या मार्केटच्या पुनर्विकासाचे काम रखडले होते.
खासदार झाल्यावर वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन याप्रश्नी निवेदन देऊन सविस्तर चर्चाही केली होती. त्यानंतर नवलकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. या मार्केटच्या पुनर्विकासासाठी रेल्वे कडून काही तांत्रिक अडचणी येत असल्याने त्या दूर झाल्या नंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने अखेर काल (मंगळवारी) या मार्केटच्या पुनर्विकासाच्या कामास ना हरकत प्रमाणपत्र देऊन हिरवा कंदील दाखवल्याने या मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार रविंद्र वायकर यांचे प्रयत्न व पाठपुरावा तसेच रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी दाखवलेल्या साकारात्मक भूमिकेमुळे हे काम मार्गी लागणे शक्य झाले आहे.
नवलकर मार्केट :
१) एकूण प्लॉट एरिया ३०६५ चौरस मीटर
२) ९३८२ चौरस मीटर प्लॉट वर बांधकाम प्रस्तावित
३) ४ चा एफ.एस.आय मिळणार
४) मार्केटमध्ये एकूण २३१ गाळे आहेत.
५) एकूण १३ माळ्याची इमारत असणार
६) ३ बेसमेंट, तळमजला नॉनव्हेज, १ माळा भाजीपाला, २ माळा फळ व इतर दुकाने, ३ व ४ माळा प्रकल्पग्रस्तांसाठी, ५ ते १० माळे कार्यालयांसाठी,
७) प्रत्येक माळ्याचा प्लॉट एरिया अंदाजे ८५० चौरस मीटर
८) यात स्टोरेज, १० फुटांची लॉबी, वेज व नॉनव्हेजसाठी स्वतंत्र लिफ्ट, बेसमेंट पार्किंग, कोल्ड स्टोरेज, मार्केटला व इतर ठिकाणी जाण्यासाठी स्वतंत्र जिने.
९) मार्केटच्या पुनर्विकासासाठी अंदाजे रुपये १०० कोटींचा खर्च
१०) पावसाळ्यानंतर याचे काम सुरु होण्याची शक्यता
११) काम पूर्ण करण्यास सुमारे ३ वर्षांचा कालावधी लागणार