ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांची वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी असे, निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीस ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, ग्रंथालयाचे सहायक संचालक डॉ. विजयकुमार जगताप यांच्यासह ग्रंथालय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रंथालय श्रेणीकरणाचे निकष स्पष्ट करताना ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात रूपांतरासाठी किमान १००१ ग्रंथ संख्या , तर ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात जाण्यासाठी किमान ५००१ ग्रंथ संख्या आणि ‘ ब ‘ वर्गातून ‘अ ‘ वर्गात रुपांतरासाठी 15001 ग्रंथ संख्या आवश्यक आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या प्रस्तावित इमारतीसह अधिनस्त कार्यालयांच्या प्रलंबित बाबींवरही बैठकीत चर्चा झाली‘ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि सुलभता यावर भर द्यावा ऑनलाइन प्रणाली विकसित केली तर ग्रंथालय सेवांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
सादरीकरणातच्या माध्यमातून ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, अनुदान प्रणाली, विभागीय व जिल्हास्तरीय ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालय समित्या, नवीन ग्रंथ धोरण आणि ग्रंथालय सुधारित निकष यावर सविस्तर चर्चा झाली.