महाराष्ट्रमुंबईवैद्यकीय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या मदतीने चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य -मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावातील एका वाहन चालक आणि गृहिणीच्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला जन्मताच फिट्सचा त्रास होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. अशा प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे आणि समाजातील सहृदयी संस्थांच्या सहकार्याने एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत जमा झाली असून बाळावर यशस्वीरित्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.

या बाळाला जन्मताच फिट्सचा त्रास सुरू झाला होता. शारीरिक हालचालींवर ताबा नसणे, वारंवार झटके येणे आणि बाळपणाच्या गोड क्षणांऐवजी रुग्णालयाच्या चकरा, औषधोपचार आणि वेदना हेच त्याच्या आयुष्याचे वास्तव झाले होते. डॉक्टरांनी ‘एपिलेप्सी सर्जरी’ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मात्र, ९ लाख ४७ हजार १०० रुपये इतका खर्च ऐकून बाळाच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील आशा क्षणातच मावळल्या. याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने बाळाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. कक्षप्रमुख रामेश्र्वर नाईक यांच्या पुढाकाराने उपचारासाठी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून, साडे चार लाख रुपये धर्मादाय विभागातून आणि ६५ हजार रुपये स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मिळाले. अशा प्रकारे एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत उभी राहिली. या मदतीच्या आधारावर मुंबईतील महालक्ष्मी येथील एस.आर.सी.सी. चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे बाळावर यशस्वीरित्या मेंदूची जटिल शस्त्रक्रिया पार पडली. बाळाच्या मेंदूमध्ये व्हॅगस नर्व्ह स्टीम्युलेटर (VNS) चीप बसवण्यात आली असून त्याच्या तब्येत आता सुधारते आहे. त्याचे जीवन पुन्हा नव्या आशेने बहरत आहे.”या छोट्या जीवाचा आणि त्याच्या पालकांचा संघर्ष मनाला भिडणारा होता. बाळावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद आहे,” असे कक्षप्रमुख रामेश्र्वर नाईक यांनी सांगितले.

“माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पाहिलं… ही भावना शब्दात मांडता येणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि कक्षातील सर्व लोक आमच्यासाठी देवदूतच ठरले. त्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही,” अशा शब्दांत बाळाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!