मुंबई मेट्रो मार्गाखालील राडारोडा तातडीने हटविण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई :- मुंबई मेट्रो मार्गाखाली दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळाची 159 वी बैठक आज बीकेसी येथील मुख्यालयात पार पडली. त्यावेळी शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना हा राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश दिले.
मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा, मशीन, किंवा अनावश्यक वस्तू साठवून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा हे समान सुरक्षित रहावे यासाठी अनावश्यक बेरिकेड्स लावले जातात. हे बेरिकेड्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असल्याने रस्ता रुंद असूनही प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र जागोजागी पहायला मिळते. त्यामुळे काम झाल्यावर हा राडारोडा तातडीने हटवावा, तिथे काम पूर्ण झाले आहे तेथील मशिनरी तातडीने हलवून तो रस्ता मोकळा करावा, तसेच अनावश्यक बेरिकेड्स टाकून रस्ते अडवले जात असतील तर ते तत्काळ दूर करून मार्ग मोकळा करावा असे शिंदे यांनी सांगितले. तसेच हे काम नीट होते की नाही ते पाहण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने एका नोडल ऑफिसरची नेमणूक करावी, आणि या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद द्यावी असेही त्यांनी सांगितले.
मेट्रोच्या दोन खांबांमध्ये माती टाकून या भागाचे छान सुशोभीकरण करावे तसेच त्यात फुलझाडे लावून हा परिसर छान सुशोभित करावा, तसेच एकाच वेळी वर मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर तत्काळ खाली देखील हे काम करावे. जेणेकरून दोन्ही कामे एकत्रच पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच अनावश्यक बेरिकेड्स हटवल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही अंशी कमी करण्यास मदत होऊ शकेल.
यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो रुबल अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच एमएमआरडीएचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.