मुंबईमहाराष्ट्र

रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय ?- राष्ट्रवादी पक्ष

मुंबई :रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर आता गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना केंद्रसरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अतिशय माफक दरात आयात केले. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे कुठेही उल्लंघन झाले नाही असे असताना सुद्धा आता कच्च्या तेलाच्या वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय ? असा सवाल केला आहे.

ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत एकदम न्यूनतम होती तेव्हा देखील मोदी सरकारने स्वयंपाक गॅसचे दर कमी केले नाही आणि आता वाढीव किंमत आहे असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे हे योग्य नाही असेही महेश तपासे म्हणाले.

भारतात महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठलेला आहे अशा परिस्थितीत घरगुती गॅस दरवाढीमुळे सामान्यांच्या डोक्यावर अधिक आर्थिक बोजा पडेल अशी शंकाही महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

एकेकाळी इंधन दरवाढीच्या विरोधात आकांडतांडव करणारे भाजपचे नेते आता गप्प का आहेत असा प्रश्न देशातील जनता विचारत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!