चोरी करून नेपाळला पळण्याच्या तयारी; कणकवली पोलिसांची १२ तासांत दमदार कारवाई

कणकवली : कणकवली विद्यानगर येथील हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्याकडे मागील १५ दिवसापासून प्लास्टरचे काम करणारा मूळ नेपाळ येथील रहिवासी कामगार रणजीत शंकर पैसवात हजरा तुसाद (२८) याने चोरी करुन ३१ मार्च रोजी पोबारा केला होता. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला कणकवली पोलिसांनी शिताफीने अवघ्या १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या.
हरिचंद्र चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम ४७ हजार व ५.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कुडी, ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठ्या चोरून, दुचाकी घेऊन आरोपीने ३१ मार्चला पळून गेला होता. चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचे छायाचित्र किंवा कोणतीही माहिती नसताना चातुर्याने त्याचे मोबाईल क्रमांक गोपनीय माहितीगाराकडून प्राप्त करून त्याचे लोकेशन घेऊन व सीसीटीव्ही मधून त्याचे छायाचित्र प्राप्त केले. त्यानंतर आरोपी हा पनवेल रेल्वे स्थानक या ठिकाणी असल्याबाबत त्याच्या मोबाईल लोकेशनद्वारे समजते. तत्काळ कणकवलीतील रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुरवडे यांच्या मदतीने पनवेल रेल्वे पोलिसांची मदत घेऊन आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सर्व दागिने, रोख रक्कम ४४ हजार रुपये हस्तगत करण्यात आले.