महाराष्ट्र

शक्तीपीठ महामार्गावर वाद वाढला; शिंदेंना कामराच्या गाण्याची आठवण, शिक्षक फोंडे निलंबित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून यासाठी व्यापक मोहीम सुद्धा राबवली जात आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर होणार नाही, विरोध डावलून महामार्ग केला जाणार नाही, अशी भूमिका तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.

मात्र, आता सरकार आल्यानंतर शक्तीपीठ रेठण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. हा विरोध सुरु असताना कुणाल कामराच्या विडंबन गीतावरून शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आलेली भूमिका आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर कारवाईवर थेट भाष्य केल्याने कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी निलंबन मागे न घेतल्यास अत्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर आभार दोरा पार पडला. या दौऱ्यात शक्तीपीठ विरोधक आंदोलकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत दोऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांनी अनेकांची धरपकड करत जेरबंद केले होते.

गिरीश फोंडे सुद्धा सुरुवातीपासून शक्तीपीठ आंदोलनात सक्रिय आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यास थेट विरोध केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गिरीश फोंडे यांनी शिंदे यांच्या दोऱ्याला कडाडून विरोध केला होता. त्यांनी शक्तीपीठवरून बोलताना म्हटले होते की, एखादा व्यंग करणारा यांना एवढा झोंबत आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा मागे लावली आहे. आम्ही आंदोलन करत असल्याने आमच्याही मागे पोलिस यंत्रणा लावतात, पण आम्ही यांना भीक घालत नाही. कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला छान वाटलं. शब्द अन् शब्द त्यामधील आवडला. आता त्यात आम्ही शेतकऱ्यांचे शब्द घालून आम्ही सांगणार आहोत. ते गाणं आम्ही तुमच्यासमोर म्हणणार आहोत. तुम्ही लावा काय मार्ग लावायचं, राज्यघटनेनं आम्हाला अभिव्यक्ती दिली आहे.

गिरी फोंडे कोल्हापूर मनपाच्या लोणार वसाहत विद्यामंदिर शाळेत सहायक शिक्षक या पदावर आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने दर्जेदार शिक्षण देण्याचे कामकाज पूर्ण क्षमतेने करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मूळ कामाकडे दुर्लक्ष करून त्यांनी शक्तिपीठ आंदोलनात सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधात वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कलम 5 (1) मधील तरतुदीचा भंग झाल्याने त्यांच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली. 2004 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती यांच्याविरुद्ध अवमानकारक निवेदन दिले होते. महापौरांना दुरुत्तरे देऊन त्यांचा अवमान केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटीक युध यांच्या उपाध्यक्षपदी राहून जगभर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विनापरवानगी गैरहजर राहिल्याने त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!