राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद! परिसर खचण्याचा धोका

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱयाजवळ भगदाड पडल्यानंतर आसपासचा परिसर खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा कोसळल्यानंतर तिथे दुसरा 83 फूट उंच पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केला गेला. महाराजांचा पुतळा 100 वर्षे टिकेल, असा दावा उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता; परंतु महिनाभरातच चबुतऱयाजवळ भगदाड पडले. चबुतऱयाच्या किनाऱयालाही तडे गेले. निकृष्ट बांधकामामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे. समुद्रापासून राजकोट किल्ला दूर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून किल्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला धोका नाही. मात्र पुतळय़ाच्या परिसरात झालेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे परिसर खचत आहे. त्यामुळे पुतळय़ाला धोका निर्माण झाला आहे. हे निकृष्ट बांधकाम करणाऱया अधिकाऱयांवर सरकारने तातडीने व कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.