बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन

पुणे:- उद्योग क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं दुःखद निधन झालं आहे. पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बजाज समूहाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वाढलेल्या वयोमानाने हृदय आणि फुफ्फुसांच्या आजाराने त्यांना ग्रासलं होतं.त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मर्यादा येत होत्या.काही दिवसांपासून सातत्याने ते आजारी होते.मात्र,आज दुपारी अडीच वाजता त्यांचं पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये निधन झालं आहे.
बजाज समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात आणि या उद्योगाची भरभराट करण्यात राहुल बजाज यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल २००१ मध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.राहुल बजाज हे काही काळ भारतीय संसदेच्या राज्यसभेचे देखील सदस्य होते.त्यांच्या जाण्यानं उद्योग क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे.
भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली.
एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.