स्वयंसिद्ध मैत्रीण व क्रिएशन ग्रुप प्रायोजित आणि नागरी निवारा महिला मंडळ आयोजित बैग पेंटिंग कार्यशाळा

मुंबई : नागरी निवारा महिला मंडळात मागील 25 वर्ष सातत्याने दर गुरुवारी नवनवीन उपक्रम राबविले जातात. मला काय आवडतं, काय जमतं किंवा काही करण्याची इच्छा होती पण ती राहून गेली असेल तर ते शोधण्यासाठी या सर्व छंद वर्गांचा उपयोग होतो. अजूनही वेळ गेलेली नाही हे लक्षात घेऊन आत्मविश्वासाने एखादा गृह उद्योग सुरू करणे अथवा छंद जोपासण्याचा उद्देश या उपक्रमांमागे आहे.
आणि पेंटिंग म्हटलं की क्रिएशन ग्रुप म्हणजेच चित्रकार व जगन मित्र अनिल कुबल यांचं मोलाचं सहकार्य कायमच असतं. गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत चित्रांमध्ये रंग भरताना लहान मुलासारखं तल्लीन होऊन महिलांनी भरभरून आनंद घेतला. आता हे मंडळ दीड महिना बंद राहील. पूर्वीसारखं गावी जाणं एकमेकांच्या घरी येणं जाणं हे तसंही कमीच झालं आहे. यातच हा जीवघेणा उन्हाळा त्यामुळे बाहेर पडणं साफच बंद. घरात राहून त्याच त्याच कामांचा येणारा कंटाळा. कंटाळा घालवण्यासाठी मोबाईल आणि टीव्हीचा केलेला उपयोग याने येणारा मानसिक व शारीरिक ताण. यावर उत्तम उपाय म्हणजे आपले छंद जोपासनं.
त्यामुळे वर्ष अखेरीस अशा प्रकारे काहीतरी प्रेरणा देऊन वर्षभरात आपण केलेल्या गोष्टी आठवत त्यांना उजाळा देत नवनिर्मिती करता आली तर त्यासारखा सर्वांग सुंदर व्यायाम नाही . आणि हाच गृहपाठ आहे यावेळी आमच्या मैत्रिणींना. पाहूया काय काय करून विकतात आणि काय काय वस्तू बनवून आपल्या मित्र-मैत्रिणींना कुटुंबीयांना सुंदर सुंदर भेट देतात. प्रत्यक्ष पैसा कमावला नाही तरी इतरांना भेट देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूने पैसे तर वाचतातच पण त्याचबरोबर मिळणारा आत्मिक आनंद आणि प्रियजनांकडून होणार कौतुक यासारखं प्रोत्साहन जगात नाही. आणि याकरिताच स्वयंसिद्ध मैत्रीण 1994 पासून जेष्ठ मुलं व महिलांसोबत काम करत आहे.

हे सातत्याने करणे एकट्या दुखट्याचे काम नाही.
याकरिताच लागतं संघटन सहकार्य आणि सद्भाव.

तसंच कोणीतरी अगदी सोबत येऊन बरोबरीने ही जबाबदारी स्वीकारणे. मनीषा भोसले राजश्री कवळे, रतन उगले, अपर्णा पडवळ, गीता बिवलकर, नेहा तावडे, नयना राऊळ, शुभांगी आचरेकर तसेच आता नव्याने सहभागी झालेल्या वैशाली नायक, मनीषा पाटील विनिता गायकवाड, सुनिता लोखंडे, शुभदा घोसाळकर, अर्चना गणेशपुरे या साऱ्यांमुळेच हे सारे शक्य आहे .
म्हणूनच सहभागी होणाऱ्यांसाठी आणि सहकार्य देणाऱ्यांसाठी खूप सारा आदर प्रेम आणि कृतज्ञता!





