महाराष्ट्र

भर समुद्रात मालवाहू जहाजाची मच्छीमार नौकेला धडक; चौदा खलाशांचे प्राण वाचले!

पालघर: समुद्रकिनाऱ्यापासून तीन नॉटिकल माईल दूर समुद्रात ‘श्री साई’ या मच्छीमार नौकेला १४ऑगस्ट रोजी रात्री एका मोठ्या लाल रंगाच्या मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच ‘जय साईप्रिया’ आणि ‘जय साईराम’ या दोन बोटींनी अपघातग्रस्त नौकेला वेळेवर मदत पोहोचवली. १४ ऑगस्ट रोजी रात्री ९.२५ च्या सुमारास ‘श्री साई’ नौका समुद्रात असताना एका मोठ्या लाल रंगाच्या मालवाहू जहाजाने तिला धडक दिली. या धडकेने बोटीवरील १५ पैकी चार खलाशी समुद्रात फेकले गेले. काळोख असल्याने त्यांना कसेबसे जीवरक्षण करत पुन्हा बोटीजवळ येणे शक्य झाले.
अपघात होताच ‘श्री साई’ बोटीचे सहमालक संतोष तरे यांनी तात्काळ वायरलेसद्वारे जवळच्या ‘जय साईप्रिया’ बोटीचे तांडेल जितेंद्र तरे यांना मदतीसाठी संदेश पाठवला. संदेश मिळताच जितेंद्र तरे यांनी ‘साईप्रिया’ आणि ‘जय साईराम’ बोटीचे तांडेल शांताराम ठाकरे यांच्यासह अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढले.
अपघातग्रस्त नौकेला बांधून ‘जय साईप्रिया’ आणि ‘जय साईराम’ या बोटींनी रात्री १०.३० वाजता मुरबे बंदराकडे प्रवास सुरू केला. वाऱ्याच्या तीव्र प्रवाहामुळे बोटीत पाणी शिरत होते, तरीही सर्व खलाशांनी आणि तांडेलांनी जिवाच्या आकांताने पाणी बाहेर फेकले. अखेर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुरबे येथील दोन मासेमारी बोटींच्या मदतीने ही अपघातग्रस्त नौका सातपाटी-मुरबे बंदरात सुखरूप पोहोचली.
या अपघातात ‘श्री साई’ बोटीचे मोठे नुकसान झाले असून, ती दोन तुकड्यांमध्ये तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे सर्व खलाशांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!