महाराष्ट्र

“लाडक्या बहिणींचा सन्मान, संघटनात्मक ताकद आणि सशक्त महिला नेतृत्व हेच शिवसेनेचे ब्रीद” — उपसभापती नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनातून सांगली जिल्ह्यात शिवसेना महिला मेळावा उत्साहात पार

सांगली : विधान परिषद उपसभापती  नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत गोऱ्हे यांनी महिलांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान, आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत विविध योजनांची माहिती दिली.

“महिलांना दिलेले वचन म्हणजे आमचं कर्तव्य,” असे ठामपणे सांगत त्यांनी लाडकी बहिण सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, २१०० रुपये अनुदानाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, महिला बचतगटांना आधार देणाऱ्या बँकांची यादी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

 गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, “अनेजण शिवसेना शिंदे गट असा उल्लेख करतात पण शिवसेना ही आपलीच आहे, हे आता प्रत्येक कार्यकर्त्याने मनात ठसवणे गरजेचे आहे.”

महिलांच्या आरोग्यावर भर, पंचायत समित्यांत प्रतिनिधित्वाचे आवाहन

 गोऱ्हे यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांबाबत माहिती दिली. हिमोग्लोबिन, कॅल्शियम, आयर्न तपासणीपासून ते गर्भाशयाच्या आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी महिलांना संधी मिळावी यासाठी संघटनात्मक तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सभासद नोंदणी मोहीमेस चालना

महिलांना संघटनेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत, “प्रत्येक भगिनीने किमान २० नवीन सभासद नोंदणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून पक्षाची ताकद वाढेल आणि स्थानिक नेतृत्व घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.  नीलम गोऱ्हे यांचा स्वागत सत्कार सांगली जिल्हा संपर्कप्रमुख सुनीता ताई मोरे, रुक्मिणी आंबीगेर, ज्योती दांडेकर, अर्चना माळी, राणी कमलाकर, मनीषा पाटील व आशा पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुनीता ताई मोरे यांनी केले, तर जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर माजी जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. रावसाहेब घेवारे सह संपर्कप्रमुख यांनी देखील यावेळी आपले मनोगत मांडले.

या मेळाव्यादरम्यान महिलांचा मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रवेश सुद्धा झाला, ज्यामुळे सांगलीतील महिला संघटना अधिक बळकट होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!