आरे आणि दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना ‘पंतप्रधान आवास योजनेतून’ घरे उपलब्ध करून देण्याची मागणी….
खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अंतर्गत केली मागणी.....

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनी आणि दिंडोशी येथील वनक्षेत्रात गेली अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्याची मागणी लोकसभा नियम ३७७ अन्वये केली आहे.
आरे आणि दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना या सुविधा पुरवताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या रहिवाशांना माणूस म्हणून मूलभूत सुविधांनी युक्त घरे मिळावीत, यासाठी वायकर यांनी केंद्राकडे ही मागणी लावून धरली.
केंद्रीय मंत्र्यांकडून सूचना आणि योजनेची माहिती
खासदार वायकर यांच्या मागणीला उत्तर देताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी त्यांना लेखी पत्राद्वारे महत्त्वाच्या सूचना आणि योजनेची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी पत्रात नमूद केले की, केंद्र सरकार ‘पंतप्रधान आवास योजना-शहर’ (PMAY-U) अंतर्गत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पात्र लाभार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांनी युक्त पक्की घरे बांधून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे.
याव्यतिरिक्त, भारत सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात’ सुरू केली आहे. त्यानुसार, सुधारित योजना PMAY-U 2.0 ला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे.
या योजनेतून मिळणार लाभ:
या योजनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या शासकीय प्राधिकरणांमार्फत शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थींसाठी खालील घटकांमधून मदत करण्यात येणार आहे:
* माफक दरात घरे (AHP)
* माफक दरात भाड्याची घरे (ARH)
* व्याज सबसिडी योजना (ISS)
प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया
केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांनी PMAY-U 2.0 मधील नियम व तरतुदींना अनुसरून योजना तयार करावी.
ती योजना तयार झाल्यानंतर, राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी केल्या आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी PMAY-U 2.0 च्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) अर्ज करावा लागणार आहे, अशी माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.




