परप्रांतीय मतदार आणि अन्य तक्रारी घेऊन विरोधी पक्षातर्फे राज्य निवडणूक आयोगाची मंत्रालयात भेट

मुंबई: सर्व पक्षीय नेते आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर पक्ष ही आज एकत्र असतील.पण पत्रक देऊनही या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही. नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले आहेत. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहे.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदी नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान, सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मनसेसोबत जाण्याला विरोध करत काही नेत्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली असून, मनसेबरोबर जाणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केले आहे. लोकशाही अधिक बळकट व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा, हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून, आपण सहभागी झाल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा अधिक वाढेल, असे राऊत यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. या निवडणुकांच्या यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुका निष्पक्षपातीपणे, पारदर्शक व संविधानाचे पूर्ण पालन व्हावे ही राजकीय पक्षांची भूमिका आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले होते. निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर चर्चा करून आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे.