मंत्री उदय सामंत ‘उद्योग गुरु’ पुरस्काराने सन्मानित

पनवेल : पनवेल येथे प्रशांत सागवेकर व त्यांच्या पत्नी साक्षी यांच्या परिणीता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात उदय सामंत ह्यांना सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते “उद्योग गुरु” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामशेठ ठाकूर यांनी आम्हाला उद्योग-व्यवसायाध्ये श्रीगणेशा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याच रामशेठ ठाकूरजी यांच्या शुभहस्ते मला हा पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो, असे यावेळी उदय सामंत ह्यांनी म्हटले. समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना यावेळी विविध पुरस्कारांनी उदय सामंत ह्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
समाजात विविध प्रकारच्या विषयांवर सामाजिक कार्य करण्याचे काम परिणीता फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. परंतु तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भविष्यात या फाऊंडेशनने काम करून तरुणांची एक निरोगी, निर्व्यसनी पिढी घडविण्यासाठी समाजहिताचे अतिशय महत्वाचे कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केली. माझ्या या सामाजिक कार्य करणाऱ्या मित्राच्या कार्याला भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उदय सामंत ह्यांनी दिले.