महाराष्ट्र

१५ गिधाडांचे थक्क करणारे स्थलांतर – तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास!

अमरावती : सुमारे तेराशे किलोमीटर अंतरावरील हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलेल्या ३४ गिधाडांचे महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम स्थलांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १५ गिधाडांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा रेंजमधील प्री-रिलीज’ पक्षीगृहात यशस्वीरीत्या सोडण्यात आले. ही सर्व गिधाडे निरोगी असल्याचे सांगण्यात आले आहे. सहायक वनसंरक्षक आरिया, वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने आणि सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही गिधाडे पक्षीगृहात सोडण्यात आली. यावेळी बीएनएचएसचे (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) संवर्धन जीवशास्त्रज्ञ भास्कर दास आणि फील्ड असिस्टंट लखन बासुदावे उपस्थित होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांत प्रजनन केंद्रे आहेत. या चार प्रजनन केंद्रांमधील अनेक गिधाडांचे स्थलांतर केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हरियाणातील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रातून ३४ गिधाडे महाराष्ट्र वनखात्याच्या सुपूर्द करण्यात आली. यात २० लांब चोचीच्या तर १४ पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा समावेश आहे.

हरियाणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक सक्सेना, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव आणि बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे हे या मोहिमेला मार्गदर्शन करीत आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने देशातील गिधाडांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत देशाच्या वेगवेगळ्या भागांत गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे उभारण्यात येत आहेत. मध्य भारतातील गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी हरियाणातून ही गिधाडे महाराष्ट्रात स्थलांतरीत करण्यात आली आहेत. दोन ते सहा वर्षे वयोगटातील निवडलेल्या गिधाडांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर सुरक्षित लाकडी पेटीत त्यांना हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!