विविध पिकांवरील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्या..! – शरद पवार
वेंगुर्ले (राजन चव्हाण )– वेंगुर्ले इथल्या फळ संशोधन केंद्रात विविध पिकांवर आतापर्यंत जे संशोधन झाले आहे आणि भविष्यात जे संशोधन होणार आहे ते केंद्रापुरते, विद्यापीठापुरते सीमित न रहाता ते कोकण, महाराष्ट्र आणि देशातल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत गेले पाहिजे’ अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले इथल्या फळ संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची आणि केंद्रात सुरु असलेल्या संशोधन कार्याची माहिती घेतली. तासाभराच्या या भेटीत पवार यांनी विविध फळपिके, गरम मसाले आदी पिकांची माहिती घेतली. कोकणातल्या,विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजूची एकूण लागवड,त्यांचे एकूण उत्पादन, प्रक्रिया उद्योग,भविष्यातील स्थिती,शेतीतील’ए आय’चा वापर आदिची माहिती घेऊन काही सूचना केल्या. तसेच विद्यापीठाच्या समस्या,केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यात लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.
सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, रजिस्ट्रार प्रदीप हळदवणेकर,केंद्राचे प्रफुल्ल माळी, महेंद्र गवाणकर यांनी विद्यापीठच्या कामाकाजाची आणि केंद्रातल्या विविध संशोधनांची माहिती पवार यांना दिली. या भेटीच्या निमित्ताने केंद्रातल्या विविध फळपीके, व उत्पादाने याचे एक छोटे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याची पहाणी पवार यांनी केली.सौ. प्रतिभाताई पवार यांनीही या प्रदर्शनाची पहाणी स्वतंत्रपणे केली.
बैठकीला ‘फोमेंटो रिसॉर्ट’ चे मालक अवधूत तिम्बलो, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,व्हिक्टर डांटस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,प्रसाद रेगे, जयप्रकाश चमणकर,पत्रकार आदिती पै, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,नम्रता कुबक, व्ही.के, सावंत, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.






