चुकीचे छापता… दाखवता… मुलाखत परत होईल! – मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांसमक्ष पत्रकारांना धमक्या

कल्याण: कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांदिवलीतील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या बाल चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीवर हल्ला करणारा गोकुळ झा या बिहारी गुडाचा माज कमी होण्याऐवजी इतका वाढला की, त्याने पोलिसांसमक्ष प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धमक्या दिल्या.
दोन दिवस पोलिस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर करण्यापूर्वी कोठडीतून बाहेर काढताना या गुलाने चुकीचे छापता… दाखवतात… थांबा लवकरच मुलाखत होईल. अशा धमक्या दिल्या. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेण्याची मागणी प्रसार माध्यमांनी केली आहे.
कल्याणमध्ये उत्तर भारतीय गुंड प्रवृत्तीच्या तरूणाने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीवर हल्ला केल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी राजसैनिकाच्या साह्याने हल्लेखोर गोकुळ झा याचा शोध घेऊन कोठडीचा रस्ता दाखविला. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने हल्लेखोर गोकुळ याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली डोती. शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी पोलिस कोठडीतून न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याने पत्रकारांना धमकी दिली.
एका गुन्ह्यात जामीन मिळाल्याने हा गुंड नुकताच तुरूंगातून बाहेर आला होता. पोलिसांनी गोकुळ झा याचा भाऊ रणजितला देखील ताब्यात घेतले आहे. गोकुळ झा हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटना ताज्या असतानाच मराठी तरूणीला मारहाण केलेल्या प्रकरणासंदर्भात आपल्या विरोधत झालेल्या वार्तांकनामुळे चिडलेल्या गोकुळ झा याने शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यापूर्वी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिली. या संदर्भात व्हिडिओ देखील समोर आला आहे.
तुम्ही सगळं चुकीचं छापलं आहे. चुकीचं दाखवलं जात आहे. तुम्ही हे चुकीचं केलंय. आपली लवकरच भेट होईल. मुलाकात परत होईल, अशा शब्दांत गोकुळ झा याने पोलिसांसमोर वृत्तांकन करण्यास गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिली. पोलिसांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. तथापी या उन्मत्त गुडाने पोलिसांशी देखील हुज्जत घातली. त्यामुळे महाराष्ट्रात राहून मराठी तरूणीवर सर्वांसमक्ष हल्ला करण्यापर्यंत मजल गाठणाऱ्या या बिहारी गुंडाची मस्ती अजूनही उतरली नसल्याचे पोलिसांसमक्ष दिसून आले आहे. इतकेच काय त्याने बेड्या लावायच्या नाहीत. बुरखा घालायचा नाही, अशी अरेरावीची भाषा करत पोलिसांशी देखील हुज्जत घातली. त्यामुळे या उन्मत्त गुंडाला पोलिसांनी बेड्या बुरख्या शिवाय कोठडीतून बाहेर काढून गाडीत नेऊन कोबले.
सोमवारी २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कल्याण मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली परिसरातील बाल चिकित्सालयात डॉक्टरांना भेटायला गेलेल्या गोकुळ झा याने रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर अर्थात औषध कंपन्यांचे प्रतिनिधी बसले होते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना थोडा वेळ थांबायला सांगितले होते. रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकुळला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यामुळे तो चिडला आणि त्याने तिला मारहाण केली. आपल्या केसांना धरून फरफटत नेले आणि छाती/मानेवर लाथा घातल्या. यात आपला गणवेश देखिल फाटल्याचे रिसेप्शनिस्ट तरूणीने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी गोकुळ झा याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. तथापी दोन दिवस पोलिस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे. तत्पूर्वी निर्ढावलेल्या या गुडाने दिलेल्या धमक्यांची पोलिसांनी नोंद घेऊन कारवाई करण्याची प्रसार माध्यमांनी मागणी केली आहे.