महाराष्ट्रक्राइम

‘त्या’ गुंडाना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण -एकनाथ खडसे

नातीच्या छेडछाड प्रकरणी खडसेंचा गंभीर आरोप

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताई नगर भागातील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जळगावात एकच चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि रक्षा खडसेंचे सासरे घडलेल्या प्रकारानंतर संतापले आहेत.

“राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. मुली पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. मुलींची सुरक्षा ही बाब अवघड आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

छेडछाडीच्या या प्रकरणाबाबत रक्षा खडसे यादेखील पोलिसांशी बोलल्या आहेत. मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं होतं. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करतात. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

रोहिणी खडसे या घटनेबाबत म्हणाल्या की, राज्यात गुंडगिरी, दडपशाही हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. महाराष्ट्राची ही एक शोकांतिका म्हणावी लागेल की, हे गुंडगिरी करणारे ज्यांची तक्रार केंद्रीय मंत्र्यांना जाऊन करावी लागते. ते एका महायुतीच्या आमदारांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडूनच या गुंडांना पाठबळ मिळालं आहे. त्यामुळे गेले दोन दिवस तक्रार केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवर छेडछाडीचे प्रकार होत आहेत आणि त्यांच्या महायुती सरकारच्या एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली कारवाई केली जात नाही. गुंडांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे. मुलगी कोणाचीही असली तरी ती मुलगी आहे. हा विचार करून कारवाई होणे अपेक्षित असते. परंतु दोन दिवस कारवाई होत नसेल तर ही बाब निषेधार्हच आहे असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!