महाराष्ट्रमुंबईवैद्यकीय

हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई  : – पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीने एकात्मिक विकास आराखडा सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बी जे वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. येथील महात्मा गांधी सभागृहामध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसन क्षमता अपुरी पडत आहे. या सभागृहात ५०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि या ठिकाणी सुमारे १५०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून पंधराशे आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावे.

यावेळी हेरिटेज वास्तू विशारद आभा लांबा यांनी ऑडिटोरियमच्या पुनविकासाबाबत सादरीकरण केले.

एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या नवीन पदव्युत्तर वसतीगृहाच्या निर्मितीस तत्वतः मान्यता
वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.

या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता,मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, बी जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, हेरिटेज वास्तु विशारद आभा लांबा उपस्थित होते तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
           

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!