शिक्षणच मुस्लीम समाजाला विकासाकडे नेईल! – श. नू. पठाण

नागपूर : शिक्षणच मुस्लीम समाजाला विकासाकडे घेऊन जाईल. त्यामुळे शिक्षणावर अधिक भर द्या. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा समन्वयाचा जागर करा, असे आवाहन माजी कुलगुरू एमआयटी पुण्याचे सल्लागार आणि दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श. नू. पठाण यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे धनवटे नॅशनल कॉलेज येथे शनिवारपासून सुरू झालेल्या दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पठाण पुढे म्हणाले, या संमेलनाचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. सर्व विचारांना सामावून घेण्यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनातून हिंदू-मुस्लीम एकोप्याचा संदेश जाऊ द्या. वारकरी संत व सुफी संतांनी मांडलेल्या सामाजिक सद्भावाची आज फार गरज आहे. या संमेलनातून सद्भाव व समन्वयाचा संदेश गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरैशी यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. ते म्हणाले, हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नाही तर मुसलमान म्हणून व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही, हे सांगण्यासाठीचे आहे. सरदार जगजित सिंग, नितीन सरदार, अब्दुल रऊफ शेख यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. संचालन नेहा गोडघाटे यांनी केले तर मुबारक शेख यांनी आभार मानले.
१२ व्या शतकापासून मुस्लीम संतांचे मराठी भाषेत लेखन आढळून येते. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवता आणि समतेचा संदेश दिला. त्याची देशाला नितांत गरज आहे, असा सूर दुसन्या सत्रात व्यक्त झाला. मध्ययुगीन मुस्लीम मराठी संताचे समतावादी साहित्य आणि संत चळवळीचा अन्वयार्थ याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या सत्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक होते. परिसंवाद उपेंद्र महाले, इ.जा. तांबोळी, सुरैया जहागिरदार, आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांनी विचार मांडले. संतांनी मध्ययुगीन कालावधीत विपुल लेखन केले. त्यांनी वर्णव्यवस्थेला कडाडून विरोध केला, असे डॉ. तांबोळी म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संतांची व्याख्या केली. त्या व्याख्येप्रमाणे मुस्लीम मराठी संतांनी सर्व मानवाला समान मानले. जाती. धर्म, रंग, पंथ त्यांच्या लेखी महत्वाचे नाही. संतांच्या या समतावादी शिकवणीमुळे समाज एकजूट राहिला, असे मत उपेंद्र महाले यांनी व्यक्त केले. संचालन जमील अंसारी यांनी केले. अनुपमा उजगरे ,पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.