बेस्ट उपक्रम टिकविण्यासाठी भाडेवाढ गरजेची
मुंबई / रमेश औताडे : बेस्ट उपक्रम टिकविण्यासाठी भाडेवाढ गरजेची आहे. त्यामुळे भाडेवाढ प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून आता परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत बेस्टच्या वाढीव खर्चाचा आढावा घेतला गेला होता. त्यानंतर पालिकेने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
बेस्टचा सध्या सहा हजार कोटींचा तुटवडा आहे आणि नवीन बसगाड्यांची खरेदीही आवश्यक आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नसल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. २०१८ नंतर सात वर्षांनी बेस्टच्या भाड्यात वाढ केली जात आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि कर्मचारी पगार वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कामगारांची देणी देण्यास बेस्टकडे निधी नाही. अनेक बस डागडुजी करून चालविल्या जात आहेत. सध्या बेस्टला ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ झाल्यास १४०० कोटी पर्यंत हा महसूल जाऊ शकतो. बेस्ट चे सध्याचे पाच रुपये भाडे असल्याने प्रवासी खुश आहेत. प्रवासी संख्या वाढली आहे मात्र महसूल वाढला नसल्याने बेस्ट उपक्रम टिकवणे अवघड झाले असल्याने हि भाडेवाढ गरजेची आहे.
भाडेवाढीचे प्रस्तावित स्वरूप
०-५ किमी : ५ ऐवजी १० रुपये
५-१० किमी : १० ऐवजी १५ रुपये
१०-१५ किमी : १५ ऐवजी २० रुपये
१५-२० किमी : २० ऐवजी ३० रुपये
वातानुकूलित बसचे प्रस्तावित दर :
०-५ किमी : ६ ऐवजी १२ रुपये
५-१० किमी : १३ ऐवजी २० रुपये
१०-१५ किमी : १९ ऐवजी ३० रुपये
१५-२० किमी : २५ ऐवजी ३५ रुपये