ईडी कार्यालयाला आग लागली की लावली? विरोधकांचा सवाल; फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानंतर विरोधकांकडून यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही आग लागली की लावण्यात आली याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. या आगीत महत्त्वाच्या प्रकरणांचे पुरावे गहाळ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप गंभीर गोष्ट आहे. जिथे पार्किंगचा प्रश्न नाही, रस्ता मोठा आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोहचला? एवढं एआय आणि तंत्रज्ञान सुरू आहे मग या फाईल जळाल्यातर त्याचा बॅकअप असला पाहिजे, नसला तर हे धक्कादायक आहे. एकतर आग कशी लागली? वेळेत विझवली का गेली नाही? याची उत्तर बीएमसीला द्यावी लागतील. काँग्रेसचे नेत्यांनी देखील या आगीच्या घटनेवरून सरकारवर संशय व्यक्त केला आहे. “सब गोलमाल है भाई सभ गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढी चाल है असं म्हणण्याचा प्रसंग शेवटी आलाच. ईडीने स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले. आता कुठलेच पुरावे नाहीत हा कांगावा करण्याकरिता आग लावून हे मोकळे झाले आहेत. राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा अत्यंत दृष्ट नमुना आहे.” अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली आहे.
“लावली का लागली हे परमेश्वराला माहिती, पण कालचक्र उलटं फिरून आलं ना? शॉर्ट सर्किटमुळे मंत्रालयाला लागलेली आग जणू काय त्यावेळचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन सहव्या मजल्यावर लावली होती अशीच बोंबाबोंब त्यावेळचे विरोधपक्ष आणि आत्ताचे सत्ताधारी करत होते. आता म्हणायला जागा आहे. त्यांचे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते, ईडीत अडकून सत्ताधारी पक्षात गेले. त्यामुळे संशयाला जागा आहे, त्यामुळे आग लावली असेल,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. फडणवीस काय म्हणाले? दरम्यान आगीच्या या घटनेवरून विरोधक संशय व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ईडीच्या कार्यालयाला आग लागली असली तरी तिथली कागदपत्रे सुरक्षित आहेत. ते म्हणाले की, मी मुंबईतील ईडीच्या अधिकान्यांशी बोललो त्यांनी मला सांगितलं आहे की कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित आहे. त्या कागदपत्रांचे मिरर इमेजिंग स्टोरेज देखील आहे. या आगीमुळे कार्यालयातील कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.