
दापोली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील अलिशान बंगला जमीनदोस्त करण्याची कारवाई अखेर सुरु झाली आहे.
परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. दरम्यान नार्वेकरांनीच बंगला पाडण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त असून ही शासकीय कारवाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यतात आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. या बंगल्याची प्रत्येक भिंत न भिंत पाडण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी या तोड कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे.
हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत. दरम्यान, आज नार्वेकर आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसे ट्विटच केले आहे.