जोगेश्वरी पूनम नगर येथील पी.एम.जी.पीच्या अति धोकादायक इमारतीमधील ९८२ कुटुंबांचे रक्षण करा

मुंबई : पूनम नगर जोगेश्वरी येथील अति धोकादायक असलेल्या पी.एम.जी.पीच्या १७ इमारतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून देखील पुनर्विकासाबाबत अद्याप शासनाने प्रभावी कार्यवाही आजपर्यंत केली नसल्याने येत्या पावसाळ्याच्या आत पुनर्विकास सुरु करून येथील ९८२ सदनीकाधारकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
पूनाम् नगर येथे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी १७ इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारतीना ३५ वर्ष पेक्षा अधिक काळ झाल्याने या इमारती अत्यंत धोकादायक झाल्या असून अनेक ठिकाणी स्लॅब पडण्याच्या घटना घडत असून या दुर्घटनेत काही जण जखमीही झाले आहेत. येथे केव्हाही या इमारती कोसळून गंभीर मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या अत्यंत धोकादायक १७ इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार, बैठका, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी, तसेच विधानसभेत विविध लोकशाही आयुधांच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाचे लक्षही वेधले. या इमारतीचा पुनर्विकास म्हाडा करणार असा निर्णयही घेण्यात आला. निविदा प्रक्रिया ही पार पडली, मात्र त्यानंतर पुनर्विकासाबाबत कुठलीच कार्यवाही आज पर्यत करण्यात आली नसल्याने या अति धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या राहिवाश्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
येथील अति धोकादायक १७ इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत तातडीने निर्णय घेऊन येथे वास्तव्य करणाऱ्या सुमारे ९८२ राहिवाश्याच्या जीवाचे रक्षण करावे, अशी विनंती खासदार रविंद्र वायकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.