नवी दिल्ली

दिल्लीतल्या दिग्गजांचे सोबती यशवंत उर्फ आबा मुळ्ये ! -योगेश वसंत त्रिवेदी

दिल्ली : “अरे यशवंत ! तुमने जो मेरा साक्षात्कार लिया हैं नां उसे मेरे भाषणमें तब्दील कर दो !” “अरे यशवंत, कैसे हो ? आजकल क्या दिल्ली छोड के मुंबईमेंही बस गये हो ?, अच्छा चल रहा हैं नां सबकुछ ? चलो अच्छा हुआ, पुरी जिंदगी भाग दौडमें गुजारी आपने”. हे संवाद आहेत आज नव्वदी ओलांडून एक्याण्णव व्या वर्षात पदार्पण करणारे, तरीही न थकलेले न दमलेले यशवंत उर्फ आबा मुळ्ये यांच्या बरोबरचे दिल्लीतल्या दिग्गज नेत्यांबरोबरचे. डॉ. राम मनोहर लोहिया, लालकृष्ण अडवाणी, चंद्रशेखर अशा भारतीय राजकारणातील दिग्गज नेत्यांसमवेत यशवंत उर्फ आबा मुळ्ये यांनी आपला ऐन उमेदीतला काळ नवी दिल्ली येथे व्यतीत केला आहे. पोरसवदा असलेल्या यशवंतने सायकलीवरुन नवी दिल्ली येथे डॉ. राम मनोहर लोहिया काय, अटलबिहारी वाजपेयी काय, लालकृष्ण अडवाणी काय, चंद्रशेखर काय, सुषमा स्वराज काय अशा असंख्य नेत्यांच्या मुलाखती घेण्याचे, त्यांच्या मोठ मोठ्या सभा, कार्यक्रम यांचे वृतांत घेण्याचे अहो भाग्य आबा मुळ्ये यांना लाभलेले आहे.

१३ मे १९३४ रोजी जन्मलेल्या यशवंत उर्फ आबा मुळ्ये यांनी आपल्या पत्रकारितेला १९६० मध्ये हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेमधून प्रारंभ केला. खरं म्हणजे वृत्तसंस्थेतून पत्रकारिता करतांना चांगल्या कामाचे श्रेय संस्थेला जाते. पत्रकार पडद्यामागे राहतो. आबांचेही तसेच झाले. आजच्या जमान्यातील ब्रेकिंग न्यूज त्या १९६० च्या दशकात आबांनी भरपूर दिल्या. त्यांना ऐन तारुण्यात भरपूर शिकायला मिळाले. थोरा मोठ्यांचे संबंध सुद्धा प्रस्थापित झाले परंतु त्यांचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आबांनी कधीही उपयोग करुन घेतला नाही. आचार्य नरेंद्र देव आणि डॉ . राम मनोहर लोहिया हे अतीशय लोकप्रिय नेते होते. त्यांनी समाजवादी विचारसरणीचा झंझावात उभा केला होता. कर्पूरी ठाकूर, एस एम जोशी, प्रा. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस अशी दिग्गज नेते मंडळी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी चळवळीत जोडली गेली होती. हिंदुस्थान समाचारचे महाव्यवस्थापक  बालेश्वर अग्रवाल यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना सांगितले की मी एका मुलाला तुमची मुलाखत घेण्यासाठी पाठवीत आहे. ही मुलाखत घेण्याची जबाबदारी अग्रवाल यांनी यशवंत मुळ्ये यांना दिली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना यशवंत मुळ्ये यांनी ती मुलाखत घेतली. त्याच दिवशी सायंकाळी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर डॉ. राम मनोहर लोहिया यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पण प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाला. यशवंत मुळ्ये हे सभेला जाऊ शकले नाहीत. त्यांनी दूरध्वनीवरून डॉ. लोहिया यांना मुलाखत वाचून दाखवीत ती प्रसारित करण्याची परवानगी मागितली. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी होकार दिला आणि ती मुलाखत भाषण म्हणून हिंदुस्थान समाचार तर्फे ज्या ज्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली. प्रचंड गाजली. डॉ. लोहिया यांना ती अतीशय आवडली. “अरे, यशवंत, तूने तो कमाल कर दिया”, अशा शब्दांत पाठीवर थाप ठोकीत प्रशंसा केली. डॉ . लोहिया आणि समाजवादी कार्यकर्ते ढाब्यावर चहा घेण्यासाठी जमत असत. यशवंत मुळ्ये यांचे कुरळे केस असल्याने डॉ. लोहिया हे अग्रवाल यांना, “अरे वह घुंगराले बाल वाले लडकेको भेज दो”, असे सांगायचे. भारतीय जनसंघाचे नेते लालकृष्ण अडवाणी हे आबांच्या विवाहाला आवर्जून उपस्थित राहिले होते आणि त्यावेळी आबांनी, मेरे लडकेकी शादी में आप प्रधानमंत्री की हैसियतसे आना, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. समाचार, समाचार भारती, पीटीआय भाषा या वृत्तसंस्थांमधून काम करतांना अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

ते नवी दिल्ली येथून मुंबई येथे आले आणि मुंबईत पीटीआय भाषा मधून सचिवालय, मंत्रालय, विधिमंडळ यांत आपला दबदबा निर्माण केला. आबांकडे सर्वच जण आदराने पहात. वि. स. तथा आबा बर्वे, आबा मुळ्ये, वसंतराव तथा दादा देशपांडे, बाळासाहेब देशपांडे, मधू शेट्ये, दिनू रणदिवे, पी. के. नाईक, व्ही के नाईक, रावसाहेब गजीनकर अशी दिग्गज पत्रकारांची मांदियाळी मराठी हिंदी पत्रकारितेने पाहिली. नवी दिल्ली येथून मुंबई येथे आलेले मोठमोठे नेते आपुलकीने आबांना यशवंत नावाने हाक मारतांना आम्ही पाहिले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना भारतीय जनता पक्ष कार्यालयात तर चंद्रशेखर यांना रिट्झ हॉटेलमध्ये आबांशी दिलखुलास बोलतांना आम्हाला पहायला मिळाले आहेत. चंद्रशेखर पंतप्रधान असतांना मुंबई येथे आले असतांना ते आवर्जून आबांना भेटले. मुंबईत पीटीआय भाषा आणि पीटीआय मध्ये आबा मुळ्ये आणि नारायणराव हरळीकर ही जोडी कार्यरत होती. नव नवीन पत्रकारांना मंत्रालयात, विधिमंडळात आबा यथायोग्य मार्गदर्शन करण्यापासून मागे राहिलेले नाहीत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अभ्यास दौऱ्यात ते आवर्जून सहभागी होत असत. अशाच एका दौऱ्यात आम्ही आबांबरोबर गणपतीपुळे येथे गेलो होतो. अर्थात तो दौरा आबांमुळेच घडल्याने मी आजही आबांशी बोलतांना गणपतीपुळे कुणामुळे, आबांमुळे (मुळ्ये) अशी आवर्जून हाळी देत असतो. मला जरा शब्दांशी खेळायला आवडत असल्याने कोणतीही कोटी केली की आबा हमखास म्हणायचे, अरे योगेश, तू तर खरा ‘कोट्याधीश’ आहेस. मुंबई मराठी पत्रकार संघात एक आमचा ‘कोट्याधीश’ होता राजा केळकर आणि दुसरा तू. आबांचे हे मायेच्या ममतेने मला मिळालेले प्रमाणपत्रच म्हणावे लागेल. १९९५ साली आबा सेवानिवृत्त झाले परंतु मंत्रालय पत्रकार कक्षात ते नियमित येत असत. हल्लीच साधारण कोरोनाच्या एखाद दोन वर्षांपूर्वी पासून त्यांनी वयोमानानुसार येणं थांबवलं असलं तरी भ्रमणध्वनीवर सातत्याने संपर्क असतोच. अनिल जोशी हयात होते तेंव्हा ते, विजय वैद्य आणि मी सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी नेहमी जात असू. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी त्यांचा अर्ज विजय वैद्य, अनिल जोशी आणि मी अशा तिघांनी भरुन घेतला आणि तो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे सादर केला. नरेंद्र वाबळे, अजय वैद्य यांनीही सहकार्य केले. सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांना ती सन्मान योजना सुरु झाली. मध्यंतरी मनीषा रेगे यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली तेंव्हा मी आणि डॉ. नितीन तोरसकर असे आम्ही दोघे मनीषा रेगे यांना भेटून मग सांताक्रूझ येथून विलेपार्ले येथे वास्तव्यास आलेल्या आबांना भेटायला आवर्जून गेलो तेंव्हा तर ते बेहद्द खुश झाले. नारायणराव हरळीकर, निरंजन राऊत, हेमंत खैरे आदींच्या आठवणी त्यांनी हमखास काढल्या. भरपूर गप्पा मारल्या. दिल्लीतल्या जुन्या आठवणी, किस्से त्यांनी सांगितले. भ्रमणध्वनी वरुन बोलतांना भारतीय राजकारणातील पूर्वीची नैतिकता, ध्येयधोरणे आणि आता खालावलेला दर्जा याबद्दल त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मी कोरोनाच्या काळात घरीच राहून पत्रकारिता करीत होतो. आणि याच दरम्यान मी ‘पासष्टायन’ आणि ‘गुरुजी’ ही दोन पुस्तके लिहिली. ही दोन्ही पुस्तके मी आबांकडे पाठविली. तेंव्हा त्यांनी आवर्जून मला छोटेखानी आशीर्वचन पाठविले. 

‘पासष्टायनकार’ ‘गुरुजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, काळाआड गेलेल्या (भूतकाळातील) खास करुन राजकीय घटनांना उजाळा देण्याचे काम ‘गुरुजी’नी केले आहे. असेच लिखाण पुढेही चालू राहील याची खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 20 ऑक्टोबर २०२१. आबांचे हे आशीर्वचन आणि त्यांचे सदोदित मिळणारे मार्गदर्शन म्हणजे आमच्या पत्रकारितेची ही भरभक्कम शिदोरी वाढत असल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे अतीशय अभिमान वाटतो. माझ्यावर त्यांची खास माया असल्याने त्यांना त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हे शब्दपुष्प गुंफण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यांचे या शब्दपुष्पाद्वारे अभीष्टचिंतन करतांना आबांना त्यांच्या आयुष्याचे शतक पूर्ण करण्यासाठी त्यांना ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो आणि त्यांचा शतक महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना ! 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!