‘राह-वीर’ योजना सुरू – अपघातग्रस्तास मदत करणाऱ्यास सरकारकडून २५ हजारांचे बक्षीस

मुंबई : रस्त्यावर अपघात झाला आणि कोणीतरी मदतीसाठी धावून आलं, तर आपल्याला किती दिलासा मिळतो! अशा संकटसमयी मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींना शासनाने ‘राह वीर’ योजनेच्या माध्यमातून बक्षीस दिले जाणार आहे. आता या देवदूतांच्या कार्याची दखल घेतली जाणार असून प्रोत्साहन म्हणून त्यांना 25 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. समितीमार्फत त्याची योग्य तपासणी केली जाणार असून, तिचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून या संदर्भातील कार्यवाही केली जाणार आहे. लोकांनी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यावे आणि अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे. अनेकदा वेळेवर मदत न मिळाल्यामुळे जखमी व्यक्तीचा जीव धोक्यात येतो अन् त्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. मात्र, या नव्या ‘राह-वीर’ योजनेमुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते अधिक जागरूकतेने मदतकार्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.