मालवण समुद्रकिनारी आढळला दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ पक्षी

मालवण : दांडी-झालझुलवाडी समुद्रकिनारी सोमवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास एक दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ पक्षी सापडला. समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर वाहत आलेल्या या पक्ष्याची अवस्था अत्यंत थकलेली होती. स्थानिक नागरिक आणि ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेच्या तातडीच्या मदतीमुळे या पक्ष्याला जीवनदान मिळाले.
जान्हवी लोणे आणि दीक्षा लोणे या दुपारी समुद्रकिनारी फिरत असताना त्यांना लाटांमधून एक पक्षी किनाऱ्याकडे वाहत येत असल्याचे दिसले. त्यांनी नारायण लोणे आणि भावेश लोणे यांना याबाबत सांगितले. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तो पक्षी उडू शकत नव्हता. त्याची पंखे पूर्णपणे थकून गेली होती आणि तो असह्य अवस्थेत होता. जान्हवी लोणे यांनी त्वरित ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे सदस्य अक्षय रेवंडकर, ‘ईकोमेट्स’चे सदस्य भार्गव खराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याची पाहणी केली. तो एक दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ (चरीज्ञशव ईलू) प्रजातीचा पक्षी असल्याचे ओळखले. संस्थेचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर यांनी वन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.