महाराष्ट्रमुंबई

बालविवाह रोखण्यासाठी ‘बालिका पंचायत’ उपक्रम सुरू करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी राहता यावे, यासाठी क्षेत्रातील बालगृहांबाबत माहिती व जनजागृतीसंदर्भात मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जनजागृतीसाठी बालिका पंचायत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बालविवाह रोखण्याच्या उपाययोजना, बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे, विधवांचे कृती दल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मदत कक्ष आणि दि चिल्ड्रेन एड सोसायटी संदर्भातील आढावा मंत्रालयात बैठकीत घेण्यात आला. यावेळी आयुक्त नयना गुंडे, उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव भोंडवे, उपसचिव कुलकर्णी यांसह अधिकारी उपस्थित होते.

बालविवाहास उपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाई

मंत्री तटकरे म्हणाल्या की, बालविवाह मुक्त राज्य करण्याच्या दिशेने कार्यवाही करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी मोहिम राबविण्यात यावी. तालुकास्तरावर माध्यमिक शाळांत बालिका पंचायत सुरू करण्यात यावे. समवयस्क मुली आपल्या समस्या या माध्यमातून मांडू शकतील, जेणेकरून बालविवाह रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याचबरोबर बालकांसाठी, मुलींसाठी असलेल्या योजनेची माहिती या बालिका पंचायतच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचवता येईल. तसेच बालविवाहास जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांसहीत सोहळ्यास उपस्थित असलेल्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

राज्यातील ४६८ बालसंगोपन केंद्रातील एक लाख १० हजार बालकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रलंबित लाभ तत्काळ देण्यात यावा. या योजनेशी संबंधित स्वयंसेवी संस्थांनी गृहभेटी देण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले. एकल आणि विधवा महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पाठपुरावा करावा. कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठीच्या योजना सर्व विधवांसाठी लागू कराव्यात.

मानखुर्द येथील द चिल्ड्रन एड सोसायटीच्या डागडुजीचे काम आणि संरक्षण भिंतींचे काम गतीने करण्यात यावे. दिव्यांग बालगृहाचे नव्याने करण्यात येणारे बांधकाम परिपूर्ण सोयीसुविधांसह उभारण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्प डेस्क उभारण्यात यावा. तसेच या लाभार्थी महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!