महाराष्ट्रक्रीडा

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बाजी !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

मुंबई :- ‘भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री  फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

‘ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!