महाराष्ट्रकोंकणमुंबईवाहतूक

सीएसएमटी येथील कामांमुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत, प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : होळी, जत्रा यांच्या तोंडावर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एकीकडे अतिरिक्त गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांची सेवा २१ मार्चपर्यंत अंशतः रद्द केली आहे.  मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या कामाची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नुकताच पाहणी केली. परंतु, त्यामुळे सध्या काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे. गेल्या काही कालावधीपासून सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू होते. त्यापैकी सध्या १०, ११ फलाटांचे विस्तारीकरण झाले असून १२, १३ फलाटांचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत होत आहे. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. आता २१ मार्चपर्यंत असे वेळापत्रक कायम राहणार आहे. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना त्यांचे सामान घेऊन, पुन्हा लोकलने किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!