महाराष्ट्रमुंबई

अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा ! -योगेश वसंत त्रिवेदी

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सर्वच पुरस्कार सन्मानित पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! बऱ्याच वर्षांपासून हे पुरस्कार देण्याचे राहून गेले होते ते संघाचे प्रथितयश कर्णधार संदिप चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या समितीने एका झटक्यात प्रदान केले हे अगदी सोन्याहून पिवळे झाले. याबद्दल कर्णधार आणि यशस्वी चमूचे खास खास अभिनंदन. मग त्यात शरद कद्रेकर, सुभाष हरचेकरांपासून विजय (बंड्या) साळवी, मंगेश वरवडेकरांपर्यंत तसेच २१ वर्षे मटा क्रीडा विभाग लीलया सांभाळतांनाच शासनाच्या क्रीडाविषयक धोरणे ठरविणाऱ्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला मार्गदर्शन करणारे आणि मग राजकीय पत्रकारिता करण्यासाठी मटातून मठात (सामना मध्ये) गेलेले, तेथून राजकीय पुरस्कार प्राप्त झालेले आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात उडी घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न करणारे संजय परब यांनाही पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचेही मनापासून अभिनंदन. क्रीडा पत्रकारांपासून सर्वच क्षेत्रात स्वैर संचार करणारे आणि मित्रांच्या तोंडी पप्पू म्हणून परिचित असलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचेही खास खास अभिनंदन. या सर्वच धबडग्यात एक महत्त्वाचे नांव बाजूला पडले ते म्हणजे अनिल माधव जोशी यांचे.

      द्वारकानाथ संझगिरी यांचे नुकतेच देहावसान झाले असल्यामुळे त्यांना विसरता येणे शक्य नाही आणि अनिल माधव जोशी आपण १४ डिसेंबर २०१९ रोजी इहलोकीची यात्रा संपविली असल्याने आपण स्मृतीपटलावर राहणे निव्वळ अशक्य आहे असे वाटते. म्हणूनच मी आज आपली माफी मागतो. अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा. मी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने माफी मागू शकत नाही कारण मुंबई मराठी पत्रकार संघ माझ्या सातबाऱ्यावर नाही आणि ना तर मी त्या संघाचा जबाबदार पदाधिकारी. मी केवळ वयाची पासष्टी ओलांडली असल्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाचा दरमहा १५०० रुपये निवृत्तीवेतन मिळविणारा एक सन्माननीय सदस्य. त्यामुळे मी केवळ अनिल माधव जोशी यांचा स्नेही म्हणून मी आम्हाला माफ करा, असे म्हणतोय. आपल्या पत्रकारितेत मुंबई सकाळ, लोकसत्ता, नवशक्ति, सामना असा प्रवास करतांना अनिल माधव जोशी यांनी कधी क्रीडा हा शब्द तरी लिहिला होता की नाही, याची कल्पना नाही. क्रीड वर काम केले असेल. परंतु मुरलीधर शिंगोटे बुवांच्या साखळी वर्तमानपत्रांपैकी ‘आपला वार्ताहर’ या दैनिकात कार्यकारी संपादक राजेंद्र चव्हाण यांच्या कडे अनिल माधव जोशी यांच्या नावाची शिफारस करताच त्यांनी तिथे त्यांना रुजू करुन घेतले. सुमारे बारा वर्षे अनिल माधव जोशी यांनी आपला वार्ताहर मध्ये क्रीडा सह अनेक पाने नजरेखालून घातली. जोशी वार्ताहर मध्ये ? अशा पद्धतीने नाके मुरडणारे आणि कुचेष्टा करणारे अनेक जण मग नारायण उद्योग भवन च्या पायऱ्या चढून मोठे झाले. अनेकांना अनिल माधव जोशी यांनी लिहिते केले. अनेकांना त्यांनी संधी दिली. सानिया मिर्झा पासून शरीर सौष्ठवात मिस्टर युनिव्हर्स किताब पटकावणाऱ्या प्रेमचंद डोग्रांपर्यंत अनेक जण अनिल माधव जोशी यांचे चाहते होते आणि त्यांनी केवळ जोशी यांना भेटण्यासाठी थेट लालबागच्या चिवडा गल्ली पर्यंत ‘धाव’ घेतली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या शुभहस्ते अनिल माधव जोशी यांना एक पुरस्कार मिळणार होता परंतु सचिन तेंडुलकर यांच्या व्यस्ततेमुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही आणि अनिल माधव जोशी हे बारा वर्षात तब्बल चोवीस पुरस्कार पटकावून काळाच्या पडद्याआड गेले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिमखान्याचे ते सन्माननीय सदस्य होते. विजय वैद्य, अनिल जोशी आणि मी असे आम्ही तिघे बऱ्याच वेळा या जिमखान्यात, आझाद मैदानाजवळच्या मुंबई जिमखान्यात, वांद्रे येथील एम आय जी मध्ये विनायक दळवी, सुनंदन लेले, नवनाथ दांडेकर अशा मित्र मंडळींबरोबर गप्पांचे फड रंगायचे. क्रिकेट च्या समालोचनाचा बादशहा सुरेश सरैया यांचीही भेट घडवून आणली होती. विजय वैद्य यांचेही क्रीडा विषयात फार मोठे योगदान आहे. त्यांनी क्रिकेट वर लिहिलेली पुस्तके नारायण राणे यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना पहायला मिळावा म्हणून पुस्तके विकली आहेत आणि हे त्यांनी मोठ्या मनाने मान्य केले आहे. अनेक पत्रकार अनिल जोशी आणि विजय वैद्य यांनी घडविले आहेत. अनिल माधव जोशी यांनी इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर स्तंभ लिहिले, लेख लिहिले. अनिल माधव जोशी आमचे गुरू आहेत. ते या क्षेत्रात बाप आहेत, असे म्हणणाऱ्यांच्या विस्मृतीत अनिल माधव जोशी हे गेले असे मन मानायला तयार नाही. पुढचे पाठ मागचे सपाट असे होता कामा नये, एवढीच माझी अपेक्षा. 

 योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!