महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय – प्रमाणपत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. विशेषतः विद्यार्थी, पालकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
• जात पडताळणी प्रमाणपत्र
• उत्पन्नाचा दाखला
• रहिवासी प्रमाणपत्र
• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
• राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विशेषतः दहावी आणि बारावीच्या निकालानंतर प्रमाणपत्रांसाठी होणारा ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे. यापुढे अर्जदारांना एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयातून आवश्यक प्रमाणपत्र मिळू शकेल.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय लागू झाल्यामुळे नागरिकांची आर्थिक बचत होणार असून, प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत सुलभता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.