महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले?: हर्षवर्धन सपकाळ

रस्ते, हौसिंग सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, रुग्णालये जलमय

मुंबई : पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र दिसते. जनतेचा पैशावर कंत्राटदार व सत्ताधारी यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच मुंबईकरांचे हे हाल होत आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

भाजपा युती सरकार व बीएमसी प्रशासनाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, हौसिंग सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, रुग्णालये जलमय झाली आहेत. एका पावसाने भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असे दिसत आहे. मान्सूनपूर्व कामासाठी दरवर्षी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते पण वस्तुस्थिती पाहता हे पैसे जातात कोठे? हा प्रश्न निर्माण होतो. मंत्रालय, मुंबई महापालिका प्रशासन, कंत्राटदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबईचे हे हाल होत आहेत.

मुंबई महानगरपालिकाने सन २५ – २६ या वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला व तो सन २४-२५ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुमारे १४.१९% ने अधिक होता, हा अर्थसंकल्प बीएमसीच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरला. रस्ते व वाहतूक विभागासाठी या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ५५४५ कोटींची तरतूद केलेली आहे. २०२४ मध्ये नालेसफाईसाठी २४९.२७ कोटी रुपये खर्च केले तर २०२५ मध्ये नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ३९५ कोटी रुपये खर्च केले, यासाठी ३१ कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च करुनही मुंबईतील नालेसफाई झाली नाही तर हातसफाई करुन मुंबईच्या तिजोरीमधील मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे. मुंबईला लुटणा-या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर जनता माफ करणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!