
मुंबई- कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.भारतातही पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या ही वाढू लागली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्याप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी, ‘मुंबईत २० हजार रुग्ण रोज आढळले, तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो’, असे सांगितले होते.
त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनविषयी भीती आणि चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता खुद्द पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीच लॉकडाऊनबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी याबाबतची पालिका प्रशासनाची नेमकी भूमिका मांडली आहे.
‘मुंबईत काल २० हजारच्या वर केसेस झाल्या. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर गेले. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही’, असं इक्बालसिंग चहल म्हणाले.
त्यामुळे तुर्तास तरी मुंबईत कोणताही लॉकडाऊन लागणार नसल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.मात्र,मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन इक्बालसिंग चहल यांनी केलं आहे.