
मुंबई – टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 13 वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकल्यानंतर गुरुवारी (ता. 04 जुलै) भारतीय संघ ट्रॉफीसह मायदेशी परतला आहे. विश्वचषकाची स्पर्धा जिंकल्यामुळे भारतीय संघाला बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांच्या बक्षीस देण्यात आले आहे. पण आता महाराष्ट्र सरकारने देखील सरकारी तिजोरीतून 11 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. पण यावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारला सुनावले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने भारतीय संघाला जाहीर केलेल्या 11 कोटी रुपयांबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा ते स्वतःच्या बॅगा उचलून घरी जातात. पण भारतात तशी परिस्थिती नाही. भारतातील चाहते क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतात. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आपण पाहिले की लाखोंच्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
सरकारी तिजोरीतून 11 कोटी देण्याची काही गरज नव्हती. मुंबईकर चार खेळाडूंना एक-एक कोटी देण्याची घोषणा झाली होतीच. मग इतर खेळाडूंना बक्षीस देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. क्रिकेटपटूंना आधीच खूप पैसे मिळाले आहेत. क्रिकेटपटू पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळतात, मग त्यांना पैसे का देत आहात? असा सवालच विजय वडेट्टीवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.