महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींची अमेरिकेतून थेट टीका, म्हणाले; “अत्यंत गंभीर!”

मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाचा दौरा केला. यावेळी त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल गांधींनी यावेळी आपल्या भाषणात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेरिका दौन्यावर आहेत. अमेरिकेतल्या बोस्टन या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान त्यांनी विद्यापीठात बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं दिसून आलं. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. असं घडणं केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटं लागतात. जर ही वेळ लक्षातघेतली तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असं कुठेही घडल्याचं पाहण्यास मिळालं नाही.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की “आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं होतं की मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी कायद्यातही बदल केला त्यामुळे तुम्हाला वाटलं, कुणालाही वाटलं तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट झालं आहे” असाही आरोप राहुल गांधींनी केला. तसंच मी हा मुद्दा आधीही उपस्थित केला आहे असंही ते म्हणाले.
*महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक २३५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ६० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीवर विरोधकांनी तेव्हाही प्रश्न उपस्थित केले होते.