महाराष्ट्रमुंबई

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल.

रत्नागिरी : स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी विकासाच्या अंगाने जाण्याची गरज असल्याने माध्यमे आणि सरकार यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासोबतच माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांनी येथे केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने कोकण विभागातील पत्रकारांसाठी रत्नागिरी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात उद्घाटनानंतरच्या सत्रात माध्यमांमधील नवे वळण या विषयावर हेमराज यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारिता तंत्रज्ञान आणि आशय या दोन्ही अंगाने मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे सांगताना बागुल म्हणाले, शिळा प्रेस ते डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या अंगाने माध्यमे समृद्ध झाली आहेत. नवे तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने पत्रकारितेला पूरक आहे. ते मारक नाही. या तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढवू शकतात. कोणतेही तंत्रज्ञान मानवी जीवन समृध्द करण्यासाठी वापरता येते. किंबहुना ते त्यासाठीच असते. तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे आपण ठरवावे.

माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारितेत क्रांती झाली आहे. आंतरजालाच्या जोरावर समाजमाध्यमांमधून बातमी क्षणार्धात जगभरात पसरते. त्यामुळे माहिती मिळविणे सोपे झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतानादेखील ती आपल्यावर मात करणार नाहीत, वर्चस्व गाजवणार नाहीत, स्वत्व सोडून त्याच्या आहारी आपण जाणार नाही, याची काळजी आपण घ्यावी. यासाठी आपल्यातील सृजनशीलता जपली व संवर्धित केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. संचालक बागुल म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकात विविध समाजसुधारकांनी समाजात सकारात्मक प्रबोधन घडवून आणण्यासाठी पत्रकारितेचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध राजकीय नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून परकीय सरकारच्या विरोधात जनमत जागूत केले.

स्वातंत्र्यानंतर ही पत्रकारिता देशाची गरज ओळखून विकासाच्या आशायाने विस्तारित होणे गरजेची आहे. माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व यापूर्वीच्या कालखंडात केले आहे. यापुढील काळातही ही जबाबदारी माध्यमांनी आपल्याकडे असावी या दृष्टीने विचारमंथन करून भूमिका बजावली पाहिजे, असे ते म्हणाले यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना बागुल यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक अर्चना शंभरकर, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह कोकण विभागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!