रायगड पालकमंत्रीपदावरून शिवसेनेतील असंतोष, आमदारांचा आक्रमक पवित्रा

मुंबई प्रतिनिधी : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेतील (शिंदे गट) तीनही आमदार आक्रमक झाले आहेत. पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सुटला नसल्याने या आमदारांनी नाराजी व्यक्त करत जिल्हा नियोजन विकास समितीची (DPDC) बैठक होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत, त्यांनी पालकमंत्रीपदावरचा ‘बालहट्ट’ सोडावा, अन्यथा रायगडला जाग आल्यास ‘रायगड पॅटर्न’ राबवला जाईल, असा सुचक इशारा दिला आहे. हा इशारा म्हणजे रायगड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असा इशारा असल्याचे मानले जात आहे.
काल झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना “पालकमंत्रीपदाबाबत निश्चिंत राहा,” असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही, त्यामुळे आमदारांचा रोष कायम आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. सुनील तटकरे हे अजित पवार गटातील प्रमुख नेते असून, त्यांची पकड रायगड जिल्ह्यात मजबूत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार थेट विरोधात आक्रमक झाल्याने सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुटतो की तो आणखी चिघळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.