महाराष्ट्रमुंबई

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

यवतमाळ/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झालेली आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाने सन्मान यात्रा काढली असून या यात्रेचा आवाज आर्णीतून मुंबईमार्गे दिल्लीत पोहचवू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवढणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली. यात्रा सुरु करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. या पदयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने झाला. यावेळी माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या व प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, आ. राजेश राठोड, आ. अनिल मांगुळकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, सचिन नाईक यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, लाखो गेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे असे म्हटले जाते पण या पोशिंद्याचेच प्रचंड हाल होत आहेत. आज हरभरा, कापूस, सोयाबीन, तूर, कांद्यासह कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, कष्टाचा पैसा मिळत नाही. सोयाबीन तेलाची किंमत १६५ रुपये लिटर आहे आणि सोयाबीनला भाव मात्र किलोला ३५-४० रुपये मिळतो. तेलाचा भाव पाहता सोयाबीनला ९ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे पण तो मिळत नाही, मधला मलिदा कोण खातो तर तो अदानी खातो. भाजपाने हर घर तिरंगा अभियान केले पण त्यासाठीचे झेंडे मात्र पॉलिस्टरमध्ये बनवले आणि हे पॉलिस्टर चीनमधून मागिवले. भाजपा सरकार फक्त अदानी-अंबानीचे भले करत आहे. आज या सरकारला जाब विचारला पाहिजे, आज जाब विचारला नाही तर भविष्यकाळ अत्यंत कठीण असेल. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष लढाई लढत आहे या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
यावेळी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!