क्राइममहाराष्ट्र

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातील आशाराणी भोसले प्रकरणाने खळबळ; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

"कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करून न्याय दिला जावा"; पोलीस प्रशासनाला निर्देश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी, तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज माध्यमांतून समोर आला आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून, त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

आशाराणी भोसले या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या, आणि त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे, ही बाब मन हेलावणारी आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता. चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लगेचच सोलापूरात घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत गोऱ्हे यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला सखोल आणि निष्पक्ष तपासाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करण्यात यावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आणि गळफास लावण्याच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा.

या प्रकरणात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, गोऱ्हे यांनी तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशी आग्रही भूमिका गोऱ्हे यांनी घेतली आहे.

पीडित कुटुंबाला आवश्यक ती कायदेशीर व मानसिक मदत सरकारमार्फत पुरवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. या अनुषंगाने, पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की आशाराणी यांची दोन वर्षांची मुलगी सध्या तिच्या आजोबा-आजींकडे म्हणजेच आईच्या माहेरी आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोऱ्हे म्हणाल्या, “या बाळासाठी कोर्टाची ऑर्डर घ्यावी लागेल का, की तिच्या माहेरची मंडळी स्वतः तिला सांभाळण्यासाठी तयार आहेत, याची माहिती घेऊन त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!