मुंबईत अनेक सहकारी संस्था, बँका झाल्या मात्र, ‘ज्ञानदीप’ सारखा पसारा वाढवला नाही
मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

मुंबई- ज्ञानदीप ही महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेली पतसंस्था आहे. मुंबईत अनेक सहकारी संस्था, बँका झाल्या, पतसंस्थाही झाल्या परंतु त्यांना ज्ञानदीप सारखा आपला पसारा वाढवता आला नाही. याचे सर्व श्रेय ज्ञानदीपच्या संचालक आणि सभासदांना असल्याचे प्रतिपादन भाजपा गटनेते आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी केले आहे.
आज ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या विक्रोळी शाखेच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळ्याचे उदघाटन आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ज्ञानदीप सोसायटीचे अध्यक्ष जिजाबा पवार, मुंबै बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, मा. नगरसेवक धनंजय पिसाळ, विनायक गाढवे, चंद्रकांत ढमाळ, बाळकृष्ण पवार, एकनाथ जगताप, रविंद्र केंजळे, शुभम पवार, हनुमान धिवार, निवृत्ती म्हस्के, दुर्गा वाघ, लक्ष्मण चव्हाण यांसह ज्ञानदीपचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, ज्ञानदीप ही महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेली पतसंस्था आहे. विधिमंडळाच्या सभागृहात ज्यावेळी मी सहकारावर बोलत असतो आणि महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे योगदान सांगत असतो त्यावेळी ज्ञानदीप पतसंस्थेचा मी आवर्जून उल्लेख केला आहे. मुंबईत अनेक सहकारी संस्था, बँका झाल्या, पतसंस्थाही झाल्या परंतु त्यांना ज्ञानदीप सारखा आपला पसारा वाढवता आला नाही. याचे सर्व श्रेय ज्ञानदीपच्या संचालक आणि सभासदांना आहे. ग्राहकांच्या विश्वासाला जपण्याचे काम ही मंडळी करताहेत. म्हणूनच एवढी मोठी प्रगती ज्ञानदीप करू शकले. ज्या शाखेचे आता नूतनीकरण केले त्याही बँकेची साधारण ७० कोटीच्या आसपास उलाढाल आहे. मोठ्या बँका, छोट्या अर्बन बँका जे करू शकत नाही ते तुमची विक्रोळीची एक ज्ञानदीपची शाखा करतेय हिच ज्ञानदीपची खरी ताकद असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, राज्याला सहकार चळवळीचा मोठा इतिहास आहे. परंतु अलीकडच्या काळात सहकाराला जी ताकद, उर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे तेवढे होत नाही. सहकाराच्या जीवावर मोठे होतात. आमदार, खासदार, मंत्री होतात. पण ज्यावेळी सहकाराला देण्याची वेळ येते तेव्हा चारात दोन सहकारी नेतेही मी पाहिलेत. विधिमंडळात महाराष्ट्रातील सहकाराचा कुठलाही प्रश्न येओ मी कुणाचीही परवा न करता सहकाराच्या बाजूने सभागृहात प्रत्येक प्रश्न मांडलाय. आमचे सरकार असले तरी सरकारला सहकारासाठी धारेवर धरणारा मी सहकारातील कार्यकर्ता आहे. म्हणून आज सहकार वाचवण्याची, एकमेकांना सहकारात ताकद देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शेवटी सर्व सहकारी संस्था ताकदवान होतील त्यावेळी आपले सहकार एकत्रितपणे पुढे जाऊ शकेल. येणाऱ्या काळात ‘एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथू’ या उक्तीप्रमाणे काम करण्याची गरज असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, अनेक मागण्या आपण केल्यात त्या मीही करतोय. नुकतेच अधिवेशन झाले. त्यात पतसंस्थांना ५ लाखांच्या ठेविंना संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. पुण्याला सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेतली. सरकारने १०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. कर्जदारांच्या ठेवी सुरक्षित करण्याचे काम आपल्याला करायचेय. सहकाराला सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. इथे असणाऱ्या ठेवी ह्या टाटा, बिर्ला, अंबानीच्या नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ५ लाखापर्यंतच्या ठेविंना सुरक्षित करण्याचा चांगला निर्णय घेतला. ही सर्वसामान्यांसाठी मोठी देण आहे. केंद्र सरकार जशी काळजी घेतेय तशी राज्य सरकारने घ्यावी ही मागणीही आपण पुढे नेणार असल्याचेही दरेकर म्हणाले.
सहकारातील कामे सहकारातच दिली पाहिजे
दरेकर म्हणाले की, ज्या-ज्या वेळी आपल्याला सामाजिक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका येत नाहीत तर आपल्या सर्वसामान्यांच्या बँका कामी येतात. म्हणून आपला पैसा सहकारातच पाहिजे, सहकारातील कामं सहकारातच दिली पाहिजे, अशा प्रकारे चळवळ उभी केली तर मुंबईसारख्या शहरातही सर्व अर्थव्यवस्थेवर सहकाराचे वर्चस्व राहील.